मुंबई : वांद्रे-वरळी सागरी सेतूलगतच्या वांद्रे रेक्लमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) मुख्यालयासह कास्टींग यार्डच्या अंदाजे २९ जागेचा पुनर्विकास अदानी समुहाच्या माध्यमातून केला जाणार आहे. या कामासाठी लवकरच एमएसआरडीसीचे मुख्यालय रिकामे करण्यात येणार असून मुख्यालयाचा पुनर्विकास होऊन नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत एमएसआरडीसी भाडेतत्वावरील जागेतून कारभार चालविणार आहे. त्यानुसार एमएसआरडीसीकडून दादरमधील कोहिनूर स्क्वेअर इमारतीतील जागा निश्चित करण्यात आली आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला एमएसआरडीसीचे मुख्यालय कोहिनूर स्केअरमध्ये हलविले जाणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षे एमएसआरडीसीचा कारभार कोहिनूर स्क्वेअरमधून चालणार आहे.
एमएसआरडीसीकडून राज्यभर ४००० किमीहून अधिकच्या रस्त्यांचे जाळे विणले जात असून यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी एमएसआरडीसीने आपल्या मालकीच्या भूखंडांचा विकास करून त्यातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वांद्रे पश्चिम येथील एमएसआरडीसीच्या मुख्यालयासह येथील कास्टींग यार्डच्या एकूण २९ एकर जागेचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
यासाठीच्या निविदेत अदानी समुहाने बाजी मारली आहे. दरम्यान या पुनर्विकासाला आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सुरु होऊ शकले नव्हते. पण आता मात्र प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने जनहित याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्याच्या तयारीला वेग आला आहे. त्याचाच भाग म्हणून आता एमएसआरडीसीचे मुख्यालय भाडेतत्वावरील जागेत हलविण्याची तयारी सुरु झाली आहे.
एमएसआरडीसीने वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे तात्पुरते कार्यालय मागितले होते. मात्र येथे जागा उपलब्ध न झाल्याने दादरमधील कोहिनूर स्क्वेअर इमारतीतील जागा निश्चित करण्यात आली असून यथे आवश्यक त्या कामास सुरुवात झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये एमएसआरडीसीचे मुख्यालय कोहिनूर स्क्वेअरमध्ये स्थलांतरीत होणार आहे. तर अदानी समुहाकडून भाड्यापोटी महिन्याला दोन कोटी रुपये दिले जाणार आहेत. मुख्यालय रिकामे केल्यापासून वांद्रे रेक्लमेशन येथील नवीन इमारतीतील मुख्यालयाच्या जागेचा ताबा मिळेपर्यंत महिना दोन कोटी रुपये भाडे दिले जाणार आहे. तर नवीन इमारतीत एमएसआरडीसीला ५० हजार चौ. फुटांची जागा मुख्यालयासाठी दिली जाणार आहे. फर्निचरसह ही जागा विकसित करुन अदानीकडून एमएसआरडीसीला दिली जाणार आहे.