मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बॅंकेच्या निवडणुकीला यंदा राजकीय रंग येणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनेल बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लढवणार आहे. तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचेही पॅनेल या निवडणुकीत उतरले आहे. त्यामुळे एरव्ही केवळ सभासदांपुरती असलेली ही निवडणूक यंदा चर्चेत आली आहे.
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक यंदा २१ ऑगस्ट रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी मुंबई महापालिका कामगार व कर्मचारी वर्तुळातील वातावरण तापू लागले आहे. प्रचारालाही रंग आला आहे. यंदा मात्र दोन मोठी नावे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे निवडणूक चर्चेत आली आहे. सदावर्ते यांच्या पॅनेलने एसटी महामंडळाच्या बॅंकेची निवडणूक लढवली होती. तिथे अपहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलेला असताना आता सदावर्ते यांचे पॅनेल मुंबई महापालिकेच्या बॅंकेचीही निवडणूक लढवणार असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे.
या निवडणुकीत जय महाराष्ट्र सहकार पॅनल, सदावर्ते कष्टकरी पॅनल, जय सहकार पॅनल अशी अनेक पॅनल आहेत. त्यापैकी जय महाराष्ट्र सहकार पॅनल हे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे आहे. म्युनिसिपल बॅंकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून त्याला आळा घालण्यासाठी आपण या निवडणुकीत उतरलो असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांच्या पॅनलचे विकास घुगे यांनी दिली. घुगे हे प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आहेत.
ही निवडणूक राजकीय नाही. तर ही महापालिका कर्मचाऱ्यांची निवडणूक आहे. इथे राजकारण आणून उपयोग नाही, अशी प्रतिक्रिया जय सहकार पॅनलचे उमेदवार आणि गेली तीन वेळा निवडून आलेले प्रदीप सावंत यांनी दिली. बॅंकेत अपहार होत असल्याचे आरोप करतात, पण कोणीही पुरावे देत नाहीत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. बॅंकेवर आयुक्त आणि उपायुक्त असल्यामुळे तिथे त्यांचा अंकुश असतो, असेही सावंत म्हणाले.
साडेचार हजार कोटींची उलाढाल
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बॅंकेची तब्बल साडेचार हजार कोटींची उलाढाल आहे. या बॅंकेच्या तब्बल २२ शाखा आहेत. ६० हजाराहून अधिक सभासद आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त हे या बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर अतिरिक्त आयुक्त हे पदसिद्ध उपाध्यक्ष असतात. तसेच दोन उपायुक्त हे बॅंकेचे कार्याध्यक्ष व उप कार्याध्यक्ष असतात. त्या खालोखाल बॅंकेचे १९ सदस्यांचे संचालक मंडळ असते. या १९ सदस्यांच्या संचालक मंडळासाठी ही पंचवार्षिक निवडणूक आहे. संपूर्ण मुंबईतील पालिकेची सर्व कार्यालये पालथी घालून या निवडणुकीचा प्रचार केला जातो. तसेच मुंबई बाहेर असलेल्या धरणक्षेत्रात काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंतही उमेदवार पोहोचत असतात.