गोवंडी पूर्व परिसरातील देवनार व्हिलेज रोड येथील मुंबई महानगरपालिकेच्या  दत्ताराम गणपत पाटील मनोरंजन मैदानात मियावाकी वन साकारण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने या मैदानात कदंब, तामण, बदाम करंज, सीता अशोक, शिरीष, रतन आदी सुमारे साडेतीन हजार देशी झाडांची लागवड केली आहे.

मुंबई महानगरपालिकेने वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी आणि हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०१९ मध्ये मियावाकी पद्धतीने शहरी जंगल उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. त्याअंतर्गत चार लाख झाडांची लागवड करण्याचा संकल्प सोडण्यात आला होता.  जपानी शास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी शोधलेल्या सघन वृक्ष लागवड अर्थात मियावाकी पद्धतीने मुंबईत ठिकठिकाणी चार लाखांहून अधिक देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. दोन वर्षांत चार लाख झाडांची लागवड करण्यासाठी ६४ लहान – मोठे भूखंड निवडण्यात आले होते. एका चौरस मीटरमध्ये तीन झाडे याप्रमाणे या वृक्षांची लागवड करण्यात आली होती. अनेक व्यावसायिक संस्थांमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर निधी) शहरी वनांची निर्मिती करण्यासाठी मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> मुंबई : रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना धक्काबुक्की ; गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचाच एक भाग म्हणून ‘एम – पूर्व’ विभागातील गोवंडी पूर्व येथील देवनार व्हिलेज रोडवरील मुंबई महानगरपालिकेच्या दत्ताराम गणपत पाटील मनोरंजन मैदानात सामाजिक उत्तर दायित्व निधीमधून ‘नेचर फॉरेव्हर सोसायटी’ या संस्थेमार्फत सुमारे साडेतीन हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये कदंब, तामण, बदाम, करंज,सीता अशोक, शिरीष, रतन, गुंज, समुद्रफुल, चिंच, जांभूळ, आवळा, फणस, तुती, करवंद बेहडा, सावर, अर्जुन, टेटू, डिकेमाली, काळा कुडा, कुंभी, शमी,पांढरा खैर, शिसू, कवठ यांसारख्या फळे, फुले आणि औषधी गुणधर्म असलेल्या एकूण ४२ प्रजातीच्या वृक्षांचा समावेश आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक, वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी दिली. मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत आणखी एक लाख झाडांची मियावाकी पद्धतीने लागवड करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार या झाडांची लागवड करण्यात येत आहे.