मुंबई : भटके श्वान, भटक्या मांजरी, श्वान मालक, पाळीव प्राणी, भटक्या प्राण्यांना अन्न देणारे नागरिक, विविध संस्था आदींसाठी मुंबई महानगरपालिकेने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. भटके श्वान आणि भटक्या मांजरींना खाद्य घालणाऱ्या नागरिकांना त्रास देणे हा दंडनीय गुन्हा आहे, हे सांगतानाच पाळीव श्वानासंदर्भात निश्चित करण्यात आलेले कर महानगरपालिकेकडे भरणे आणि पाळीव प्राण्यांच्या परवानासंदर्भातील नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक असल्याचे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. तसेच भटक्या प्राण्यांना खाद्य घालणाऱ्या नागरिकांसाठीही पालिकेने या मार्गदर्शक तत्त्वात अटी व नियम घातले आहेत.
माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच भारतीय प्राणी कल्याण मंडळांच्या निर्देशांनुसार, मालक, अन्न देणारे नागरिक, विविध संस्था आदींसाठी पाळीव व भटक्या प्राण्यांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या https://vhd.mcgm.gov.in/ संकेतस्थळावर सविस्तर स्वरुपात उपलब्ध आहेत. पाळीव प्राण्यांचे मालक, प्राण्यांना अन्न देणारे नागरिक, विविध संस्था आदींनी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सध्या अनेक नागरिक पाळीव श्वानांना सहचर म्हणून ठेवतात. तसेच, प्राणिमित्र/कार्यकर्ते भटक्या श्वानांची देखभाल, उपचार आणि अन्न पुरवठा करून संवेदना व्यक्त करतात. मात्र, अनेकवेळा पाळीव प्राणी मालक, भटक्या प्राण्यांचे काळजीवाहक, निवासी कल्याण संस्था व गृहनिर्माण संस्था यांच्यात मतभेद आणि संघर्ष निर्माण होतो. याबाबतची काही प्रकरणे न्यायालयातही गेली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
रहिवासी संघटनांसाठीही नियम
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये रहिवासी संघटनांसाठीही नियम घातले असून पाळीव श्वानांवर बंदी घालता येणार नाही, कुत्रा भुंकतो म्हणून बंदी घालणे वैध नाही असे म्हटले आहे. तसेच लिफ्ट वापरण्यास बंदी घालू शकत नाहीत, तरी पर्यायी लिफ्ट सुचवता येईल. बागेत फिरणे बंदी घालणे चुकीचे आहे. श्वानांना खाऊ घालणाऱ्यांमध्ये व सोसायटीमध्ये वाद असेल तर प्राणी कल्याण समिती गठित करावी, त्याचा निर्णय अंतिम असेल.
अन्य महत्त्वाचे नियम
मुंबई महापालिका नियमातील कलम १९१ ब नुसार पालिकेकडू पाळीव कुत्र्याचा परवाना घेणे आवश्यक आहे. कुत्र्याच्या विष्ठेची स्वच्छता करणे मालकाचे कर्तव्य आहे. पालकांनी कुत्रा खेळवताना व फिरवताना साखळी लावणे गरजेचे आहे १८ वर्षांखालील मुलांनी कुत्रे फिरवू नयेत. कुत्र्यांचे लायसन्स व लसीकरणाची माहिती सोसायटीला द्यावी.
प्राण्यांना खाद्य घालणाऱ्यांसाठीही नियम :
गर्दीच्या ठिकाणी खाऊ न घालावे – विशेषतः मुलांचा खेळाचा परिसर, चालण्याचे मार्ग टाळावेत.
स्वच्छता राखावी. ठराविक वेळी खाऊ घालावे. कच्चे मांस टाळावे, योग्य आहार द्यावा.
खाद्य दिल्यानंतर ठिकाण स्वच्छ करणे बंधनकारक आहे.
खाद्य देताना दुसऱ्यांना त्रास न होईल याची काळजी घ्यावी.
पाळीव व भटक्या प्राण्यांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक तत्त्वे https://vhd.mcgm.gov.in/ संकेतस्थळावर सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध असून याबाबत ९६३५८३९८८८ हा मदत क्रमांक देण्यात आला आहे.