मुंबई : मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईला वेग दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या पी उत्तर विभागातील मनोरी गावातील ४ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यात जिनिव्हा रिसॉर्टचाही समावेश आहे. मागील महिनाभरात पालिका प्रशासनाने एकूण ४४ बांधकामांवर निष्कासनाची कारवाई केली आहे.
मागील वर्षभरात मढ परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने निष्कासनाची कारवाई हाती घेतली आहे. परिमंडळ ४ च्या महानगरपालिका उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे आणि पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त कुंदन वळवी यांच्या नेतृत्वात निष्कासनाची कारवाई हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत ३ ते ५ जून दरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत जिनिव्हा रिसॉर्टसह अन्य तीन बांधकामे निष्कासित करण्यात आली. यामध्ये अनुक्रमे ६९०० व २३०० चौरस फुटांचे प्रत्येकी एक आणि १५० चौरस फुटांच्या दोन बांधकामांचा समावेश आहे. दोन जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम करण्यात आले. या कारवाईत महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.