संदीप आचार्य
मुंबई: मुंबईत करोनाचे रुग्ण रोजच्या रोज वाढत असून मे च्या दुसऱ्या आठवड्यात ही संख्या तीस हजारापुढे जाईल असा अंदाज महापालिका अधिकाऱ्यांचा आहे तर आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या मते साठ हजारापर्यंत करोनाची लागण होईल. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने आता ७५ हजार लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्याच्या दृष्टीने योजना आखण्यास सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रामुख्याने मुंबईतील करोनाची लागण होत असल्याची संख्या वाढत असून त्याची गती लक्षात घेऊन पालिकेने एकीकडे रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याचे काम हाती घेतले आहे तर दुसरीकडे संस्थात्मक क्वारंटाइनची संख्या वाढविण्यासाठी विभागवार शाळा, मंगल कार्यालयं, विविध संस्थांचे हॉल आदी ताब्यात घेण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यात आजच्या घडीला १,१९,१६१ लोक घरीच क्वारंटाइन आहेत तर ८,८१४ लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे.दोन दिवसांपूर्वी महापौर बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घरी क्वारंटाईन करून फारसा उपयोग होणार नाही, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. “प्रामुख्याने धारावी सारख्या ठिकाणी एकेका घरात १० ते १५ लोक राहतात अशा ठिकाणी घरात क्वारंटाइन करणे ही आपलीच फसवणूक असल्याचा मुद्दा पुढे आला. सार्वजनिक शौचालयं तसेच झोपडपट्टीतील लोकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून किमान ७५ हजार लोकांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची व्यवस्था केली पाहिजे” अशी आग्रही भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली आहे. आपण अशी व्यवस्था तातडीने उभी करण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना सांगितल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

परदेशी यांनीही संस्थात्मक क्वारंटाईनची संख्या वाढवली जाईल असे स्पष्ट केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. “अगदी अंधेरीपर्यंत संस्थात्मक क्वारंटाइनची व्यवस्था होणे गरजेचे आहे. धारावीसह अनक दाटीवाटीच्या विभागात तसेच झोपडपट्टीत आतपर्यंत घरोघरी जाऊन करोनाची माहिती घेण्याबाबत पालिकेचे कर्मचारीही घाबरत असतील. या कर्मचाऱ्यांना आवश्यक संरक्षण व्यवस्था करणेही गरजेचे आहे. अन्यथा खरी आकडेवारी मिळणार नाही व करोनाही पसरत जाईल” अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.

मुंबई भेटीवर आलेल्या केंद्रीय पथकानेही धारावीला भेट दिल्यानंतर अशाच प्रकारचे निरीक्षण नोंदवले असून होम क्वारंटाइन ऐवजी संस्थात्मक क्वारंटाइन वाढवले पाहिजे अशी भूमिका मांडल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे “विभागा विभागात ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यासाठी ऑक्सिमीटर, छातीचा एक्सरे काढण्यासाठी पोर्टेबल एक्सरे मशिनची व तपासणीसाठी डॉक्टर तैनात केले तरच मोठ्या प्रमाणात आपण करोनाला अटकाव करू शकू” असेही टोपे यांनी सांगितले. सर्वात महत्वाचे म्हणजे धारावी असो की वरळी कोळीवाडा, अशा ठिकाणची सार्वजनिक स्वच्छता गृहे अग्निशमन दलाच्या जेट पंपाचे फवारे मारुन स्वच्छ केले पाहिजे अशा सूचना आपण आयुक्त परदेशी यांना दिल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.

अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, “पालिकेनेही करोनाचे रुग्ण मे अखेरीस किती प्रमाणात वाढू शकतील याचा आढावा घेतला असून जास्तीतजास्त ३० हजारापर्यंत करोनाचे रुग्ण असतील असे आजचे चित्र आहे. करोनाची लागण समाजात पसरू नये यासाठी जास्तीतजास्त हॉटस्पॉट च्या ठिकाणी आम्ही तापाची क्लिनिक सुरु केली असून तेथे आमची तपासणी सुरू आहे. तसेच संस्थात्मक क्वारंटाईनसाठी वेगवेगळ्या जागा शोधण्याचे कामही जोरात सुरू केले आहे” असंही सुरेश काकाणी यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation preparing for 75 thousand people institutional quarantine due to corona scj
First published on: 25-04-2020 at 10:13 IST