मुंबई : मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाची मालमत्ता कराची देयके यंदा उशीराने वितरित झाली आहेत. अद्यापही काही ठिकाणी देयकांचे वितरण झालेले नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांना देयके देण्यासाठी वाढीव कालावधी देण्यात आला आहे. देयके भरण्याची मुदत १३ ऑगस्टपर्यंत होती, मात्र ही मुदत शहर भागातील आणि पश्चिम उपनगरांतील रहिवाशांसाठी १ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर पूर्व उपनगरातील रहिवाशांना १ डिसेंबरपर्यंत देयके भरता येणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण विभागाने मालमत्ता कर देयके भरण्यासाठी रहिवाशांना मुदतवाढ दिली आहे. मालमत्ता कराची पहिल्या सहामाही देयकांचे वितरण अद्याप पूर्ण झालेले नाही. यंदा देयकांचे वितरण विलंबाने झाले असून देयके भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. यंदा मुंबई महापालिकेने मालमत्ता करामध्ये १५ टक्के वाढ केली होती. त्यामुळे सुधारित देयकांच्या छपाईचे काम वाढले आहे. देयकांची छपाई लांबलेली असतानाच भारतीय टपाल खात्याची प्रणाली अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमुळे देयकांच्या वितरणासही विलंब होत आहे. त्यामुळे, मालमत्ताधारकांना देयकाचा भरणा करण्यासाठी ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधी मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर, मालमत्ताधारकांना २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या पहिल्या सहामाहीचे अधिदान करण्यासाठी वाढीव कालावधी देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मालमत्ताधारकांनी सुधारित वाढीव अंतिम दिनांकानुसार अधिदानाचा भरणा करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मालमत्ता कराची देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत त्याचा भरणा करायचा असतो. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पहिल्या सहा महिन्याकरिता निर्गमित केलेल्या देयकावरील तीन महिन्यांचा देय कालावधी १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत होता. यासाठी आता प्रशासकीय विभागनिहाय (वॉर्ड) वाढीव कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार, ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘ई’, ‘एफ दक्षिण’, ‘एफ उत्तर’, ‘जी दक्षिण’, ‘जी उत्तर’, ‘एच पूर्व’, ‘एच पश्चिम’, ‘के पश्चिम’, ‘पी दक्षिण’, ‘पी उत्तर’, ‘आर दक्षिण’, ‘आर मध्य’, ‘एम पूर्व’ आणि ‘एम पश्चिम’ या विभागांसाठी (वॉर्ड) २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराच्या पहिल्या सहामाहीचे अधिदान १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत करावे लागणार आहे. तर ‘के पूर्व’, ‘आर उत्तर’, ‘एल’, ‘एन’, ‘एस’ आणि ‘टी’ विभागांतील मालमत्ताधारकांना १ डिसेंबर २०२५ पर्यंत मालमत्ता कराचा भरणा करावा लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर, संबंधित प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) मालमत्ताधारकांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीच्या अधिदानाचा सुधारित दिनांकानुसार भरणा करावा. अंतिम दिनांकानंतर थकित देयकांवर दंड आकारण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.