मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेतही उत्तम यश मिळावे याकरीता मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा ‘गुणवत्ता वृद्धी उपक्रम’ हाती घेतला आहे. सन २०२५-२६ मध्ये होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना यावर्षीच पुस्तके देण्यात आली असून अदानी इलेक्ट्रिसीटी, अदानी फाउंडेशन आणि उत्थान गृप यांच्या सामाजिक उत्तर दायित्व निधीतून ही पुस्तके देण्यात आली आहेत. मराठी, सेमी मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या मार्गदर्शक पुस्तकांचे एकूण ५,५४१ संच वितरित करण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळावे याकरीता शिक्षण विभागाने ‘गुणवत्ता वृद्धी उपक्रम’ हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) यामध्ये प्रविष्ठ होणाऱ्या व आता इयत्ता ४ थी आणि इयत्ता ७ वीत असणाऱया विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच एप्रिल २०२५ पासूनच विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास सुरू व्हावा यासाठी त्यांना पुस्तके पुरवण्यात आली आहेत. अदानी इलेक्ट्रिसीटी, अदानी फाउंडेशन आणि उत्थान गृप यांच्या सामाजिक उत्तर दायित्व निधीतून (सीएसआर फंड) नवनीत प्रकाशनाचे मराठी, सेमी मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या मार्गदर्शक पुस्तकांचे एकूण ५,५४१ संच वितरित करण्यात आले आहेत.

या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्यांपैकी काही निवडक विद्यार्थ्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते सोमवारी पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे यांच्यासह अदानी इलेक्ट्रिसीटीचे संजीव मुरुडकर, कैलाश शिंदे, सुबोध सिंग, पूजा अगरवाल आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. पुस्तक स्वीकारण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी मनमोकळ्या गप्पाही केल्या.

उप आयुक्त डॉ. जांभेकर यांनी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘गुणवत्ता वृद्धी उपक्रमाची’ माहिती दिली. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. सन २०२४ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे इयत्ता ५ व ८ वीचे अनुक्रमे ३,५२५ व ३,३६५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यातील ३१७ (इयत्ता ५ वी) व २७८ (इयत्ता ८ वी) अशा एकूण ६०५ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले आहे. सन-२०२५ मध्ये इयत्ता ५ व ८ वीतून अनुक्रमे ४,१५३ व ३,६९० विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले आहेत, अशी माहिती डॉ. जांभेकर यांनी दिली. यंदा गुणवत्ता वृद्धी उपक्रमामुळे यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिकवणी

शिष्यवृत्तीची पुस्तके वितरण करण्याव्यतिरिक्त शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत दृकश्राव्य माध्यमातून अतिरिक्त शिकवणी देखील घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सप्टेंबर २०२५ पासून या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा देखील घेतली जाणार आहे.