मुंबई : गिरगाव चौपाटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उंच दुभाजक गणेशोत्सवाच्या कालावधीपुरते हटवण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीकडे प्रचंड गर्दीचे लोंढे येत असतात. अशावेळी रस्ता दुभाजकामुळे अडथळा निर्माण होतो व त्यामुळे धक्काबुक्की, चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेच्या डी विभागाने हे उंच दुभाजक तात्पुरते हटवले आहेत.
मुंबईची खास ओळख असलेल्या मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येतात. त्यातही महाविद्यालयीन तरुण तरूणींची संख्या अधिक आहे. चर्चगेट किंवा मरीन लाईन्स स्थानकात उतरून मरीन ड्राईव्हकडे जाणाऱ्यांची, तसेच चर्नीरोड येथून गिरगाव चौपाटीकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तेथे दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याच्या मधोमध असलेले दुभाजक वाट्टेल तसे कुठेही ओलांडून जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दुभाजक ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांना अटकाव करण्यासाठी पालिकेने २०१८ मध्ये गिरगाव चौपाटी समोरच्या दुभाजकांची उंची वाढवली होती. दुभाजकांवर बॅरिकेडींग किंवा रेलिंग बसवण्यात आले होते. त्यामुळे स्टंटबाज पादचाऱ्यांना चाप बसण्यास मदत झाली होती. त्यामुळे मरीन लाईन्स ते नरीमन पॉइंटपर्यंत असेच रेलिंग बसवण्याची सूचना मरीन ड्राईव्ह पोलीसांनी व चर्चगेट येथील रहिवाशांनी केली होती. त्यामुळे चर्चगेट पासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत एकाच पद्धतीचे उंच दुभाजक लावण्यात आले आहेत. परंतु त्यापैकी गिरगाव चौपाटीकडे जाणाऱ्या भागातील दुभाजक मुंबई महापालिकेच्या डी विभागाने हटवले आहेत.
याबाबत डी विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष वळंजु यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी सह पोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्यासह गिरगाव चौपाटी येथे पाहणी केली होती. त्यावेळी पोलिसांनी गिरगाव चौपाटीसमोरील काही भागातील दुभाजक हटवण्याची सूचना दिली होती. गेल्यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशीच्या अनेक पादचारी दुभाजकांवरून उडी मारत होते. त्यामुळे धक्काबुक्की, चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा गिरगाव चौपाटी परिसरातील रेलिंग व दुभाजक तात्पुरते काढा आणि गणपती झाले की पुन्हा लावा, अशा सूचना पोलिसांनी केल्या होत्या. त्यानुसार विल्सन महाविद्यालय आणि सुखसागर समोरील दुभाजक काढण्यात आले असून रस्ता सपाट केला असल्याचे वळंजु यांनी सांगितले.
गिरगाव चौपाटी ही मुंबईतील सर्वात मोठी चौपाटी असून गणेशोत्सवात मोठ्या संख्येने उंच गणेशमूर्ती तेथे विसर्जनसाठी येतात. त्यामुळे मुंबईच्या सर्व भागातून व मुंबईबाहेरूनही अनेक भाविक व पर्यटक विसर्जन मिरवणुका व उंच गणेशमूर्ती बघण्यासाठी गिरगाव चौपाटीवर हजेरी लावतात. सायंकाळी व रात्री गर्दीचा उच्चांक असतो. तसेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे लालबागचा राजा गणपती मंडळाची मूर्ती विसर्जनासाठी येते. त्यामुळे आदल्या दिवशी रात्रीपासून भाविक तेथे थांबलेले असतात. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून हे रेलिंग हटवण्यात आले आहे.
मरीन ड्राईव्हच्या संपूर्ण मार्गावरील दुभाजकाची उंची वाढवण्यासाठी वर रेलिंग लावण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. मात्र हेरीटेज समितीने त्याला विरोध केल्यामुळे उंची वाढवता येत नव्हती. मात्र २०१७ मध्ये हेरीटेज समितीने त्याला मंजूरी दिली. रेलिंगमुळे समुद्र किनाऱ्याच्या निसर्गसौंदर्यात बाधा येऊ नये, तसेच लांबूनही दृश्य दिसण्यात अडथळा येऊ नये, असे रेलिंग बसवण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार हे रेलिंग बसवण्यात आले होते.