मुंबई : ठाणे परिसरातील कचरा मुंबईच्या हद्दीत आणून टाकल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. एका ठिकाणी घाऊक प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) आणि इतर ठिकाणी त्याची अनधिकृतपणे विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक किंवा कंत्राटदार, तसेच आस्थापनांविरोधात मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. याचबरोबर खार येथून साकीनाका येथील मिठी नदी परिसरातील कचरापेटीबाहेर मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकणाऱ्या एका कॅटररवरही मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
एका विभागातील कचरा दुसऱ्या विभागात आणून टाकणाऱ्यांविरोधात मुंबई महापालिकेने कारवाई हाती घेतली आहे. त्याअंतर्गत घोडबंदर मार्ग, ठाणे येथील आयडीएफसी बँक लिमिटेडवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घाऊक प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्या (बल्क वेस्ट जनरेटर) आणि तो कचरा रात्री-अपरात्री इतर भागांमध्ये नेऊन टाकणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक किंवा कंत्राटदार, तसेच आस्थापनांविरोधात कठोर कारवाई करावी. तसेच, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले होते.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला परिसरातील ‘एल’ विभागातील पथकाने खार येथील ‘द गौरव कॅटरर्स’विरोधात गुरुवारी कारवाई केली. ‘द गौरव कॅटरर्स’कडून मोठ्या प्रमाणात उर्वरित अन्नपदार्थ ३० ते ३१ जुलै २०२५ च्या रात्री साकीनाका येथील मिठी नदी परिसरातील कचरापेटी बाहेर टाकण्यात आला होता. ही बाब ‘एल’ विभागातील पथकाच्या सदस्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संपूर्ण कचऱ्याची पाहणी करून त्यातून संबंधित आस्थापनेविषयी माहिती मिळवली. त्यानंतर, ३१ जुलै २०२५ रोजी खार येथील ‘द गौरव कॅटरर्स’च्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन त्यांच्यावर कारवाई केली. बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी-२००६ अंतर्गत आपले अंगण स्वच्छ न ठेवणे, धोकादायक कचऱ्याचे निर्देशित पद्धतीने वर्गीकरण न करता विल्हेवाट लावणे या उपद्रवाच्या संदर्भात १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
अशाचप्रकारे इतरत्र कचरा टाकणाऱ्या एकूण ७ आस्थापनांवर ‘एल’ विभागाने १२ जूनपासून आजपर्यंत ६५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. घोडबंदर मार्ग, ठाणे येथील आयडीएफसी बँक लिमिटेड, मरोळ येथील अशोक टॉवर गृहनिर्माण संस्था, विक्रोळी (पश्चिम) येथील एचडीएफसी बँक, कुर्ला येथील टॅक्सीमॅन, तसेच सिमरन गृहनिर्माण संस्था, ब्राह्मणवाडी येथील गोदावरी गृहनिर्माण संस्था, इम्तियाज लाईन डेपो यांचा समावेश आहे. या आस्थापनांना रितसर नोटीस बजावून दंड ठोठावण्यात आला आहे.