मुंबई : दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात धुळीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने आयआयटीतील तज्ज्ञांची मदत घेतली आहे. आयआयटीतील तज्ज्ञांच्या मदतीने मैदानात उडणाऱ्या धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी, तसेच हिरवळीसाठी आता गवत लागवडीचे काम हाती घेण्यात आले आहे. अनेक वर्षांपासून धुळीच्या समस्येने हैराण झालेल्या आसपासच्या नागरिकांना गवत लागवडीमुळे दिलासा मिळणार असून लवकरच संबंधित परिसर धूळमुक्त होईल असा दावा करण्यात येत आहे.
मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मंगळवारी या कामांची पाहणी केली. तसेच, कट्टा डागडुजी व माहीम किल्ल्यासंदर्भातील अन्य कामाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शिवाजी पार्क मैदानातील लाल मातीच्या धुळीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेला सोडवता आलेला नाही. दरवर्षी हिवाळा सुरू झाल्यानंतर या मैदानातील माती हवेत उडू लागते व त्याचा तेथील रहिवाशांना त्रास होतो. याबाबत स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी हे प्रकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही गेले होते. मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली.
धुळीच्या समस्येबाबत महानगरपालिकेने तातडीने कार्यवाहीला सुरुवात करावी, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. तसेच, आयआयटीचीही मदत घेण्यात आली. आयआयटीच्या अहवालानुसार माती न काढण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे माती न काढता मैदानात गवताची लागवड करण्याचे आदेश एमपीसीबीने दिल्यानंतर महापालिकेने गवत लागवडीचे नियोजन केले. त्यांनतर आता महापालिकेने मैदानात गवत लागवडीचे काम हाती घेतले आहे.
भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्क मैदानाला मंगळवारी भेट दिली. मैदान, पदपथ आणि परिसरासंदर्भात त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच, मैदान परिसरात सुधारणा, तसेच नियमित देखभाल – दुरूस्ती व स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी पालिका अधिकार्यांना केल्या. परिसरातील कट्ट्यांची दुरूस्ती करतानाच पुरेशा प्रकाश व्यवस्थेबाबत उपाययोजना कराव्यात, असे आदेश गगराणी यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील पदपथांची नियमित देखभाल आणि दुरूस्ती करावी.
झाडांचे कठडे व्यवस्थित करतानाच सोप्या आणि आकर्षक रंगसंगतीने ते सुशोभित करावेत. तसेच आसन व्यवस्था सुस्थितीत ठेवावी. जेष्ठ नागरिकांच्या दृष्टीने सुलभ आसन व्यवस्थेचे नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले. स्थानिक नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन धूळ प्रतिबंधात्मक आणखी उपाययोजना करण्यात येतील, असे गगराणी यांनी सांगितले. त्यावेळी स्थानिक आमदार महेश सावंत, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते उपस्थित होते.
कट्टा डागडुजी
छत्रपती शिवाजी महाराज मैदानाभोवतीचा संपूर्ण कट्टा काही वर्षांपूर्वी सुशोभित करण्यात आला होता. कट्ट्यावर विविध रंगसंगती असलेल्या चौकोनी आकाराचे तुकडे (चिप्स) लावण्यात आले आहेत. ते बदलून पूर्वीसारखा कट्टा करण्याची मागणी स्थानिकांनी आयुक्तांकडे केली. स्थानिक रहिवाशांच्या सूचनेचा विचार करून तेथे योग्य ती डागडुजी करावी. तसेच नियमितपणे कट्ट्याची देखभाल व दुरुस्ती करावी, अशी सूचना गगराणी यांनी अधिकाऱ्यांना केली.
माहीम किल्ल्याचे जीर्णोद्धार व पुनरुज्जीवन
माहीम किल्ला परिसराचीही गगराणी यांनी पाहणी केली. संबंधित किल्ला पुरातन वास्तू असून किल्ल्याचा जीर्णोद्धार व पुनरुज्जीवनासाठी आवश्यक उपायोजना कराव्यात. भविष्यात पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने या परिसराचे सुशोभीकरण कशाप्रकारे करता येईल याचाही विचार करण्याची सूचना गगराणी यांनी केली.