लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईकरांच्या कचऱ्याशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी कार्यान्वित केलेल्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन’बद्दल मुंबई महानगरपालिकेला गोवा येथे आयोजित ईटी गव्हर्नमेंट डिजिटेक कॉन्क्लेव्हमध्ये सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आले आहे. ३७० संस्थांना मागे सारून मुंबई महानगरपालिकेने बाजी मारली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नागरी सुविधांसाठी निर्माण केलेल्या यंत्रणेकरिता महानगरपालिकेला हा सन्मान देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते आणि अंतर्गत भागातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेला सहज, सोपी व जलद यंत्रणा विकसित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महानगरपालिकेने मुंबईतील तक्रारींच्या निवारणासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन विकसित केली. या हेल्पलाईनशी निगडित एक डॅशबोर्ड तयार करण्यात आला आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांना घनकचऱ्याशी संबंधित तक्रारी करणे सोपे झाले आहे. तक्रारींचे वेळीच निवारण होत असल्याने संबंधित हेल्पलाईनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आणखी वाचा-मुंबई: साथीच्या आजारांवरील नियंत्रणासाठी राज्यस्तरीय वॉर रूम कार्यान्वित करणार
शासकीय यंत्रणेत तंत्रज्ञानाशी निगडित सुविधा देणाऱ्या संथांना ईटी गव्हर्नमेंट डिजिटेक अवॉर्डने सन्मानित करण्यात येते. तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, नावीन्यपूर्णता, नागरिकांचा प्रतिसाद आदी निकषांच्या आधारे मुंबई महानगरपालीकेने सुवर्ण पदकावर नाव कोरले. मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याचे सहाय्यक अभियंता डेनिस फर्नांडिस यांनी हा पुरस्कार स्वीकारला.