मुंबई : पश्चिम उपनगरातील मार्वे आणि मनोरी या दोन समुद्र किनाऱ्यांना जोडणारा पूल पालिकेच्यावतीने बांधण्यात येणार असून या पुलाला पर्यावरण विभागाची नुकतीच मंजूरी मिळाली आहे. महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) ने मंजूरी दिल्यामुळे हा पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलामुळे मार्वे, मनोरी ही दोन बेटे जोडली जाणार आहेत, तसेच प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

पश्चिम उपनगरातील मालाडमधील मार्वे आणि मनोरी या दोन बेटांना जोडणारा पूल उभारण्याची घोषणा पालिका प्रशासनाने सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात केली होती. या पुलाच्या कामाला आता वेग येणार आहे. खाडीवरून जाणाऱ्या या पुलाच्या परवानगीसाठी पालिका प्रशासनाने एमसीझेडएमएकडे अर्ज केला होता. मात्र या पुलाची चर्चा सुरू झाली तेव्हापासून पुलाला मासेमारी करणाऱ्या संघटनांनी विरोध केला होता. त्यामुळे गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात एमसीझेडएमएच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. या पुलामुळे मत्स्य व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजावर होणारे परिणाम, त्यांच्या उदरनिर्वाहावर होणारे परिणाम, सामाजिक बदल, तसेच पर्यावरणावर होणारे आघात याबाबत चर्चा करण्यात आली होती. तसेच मच्छिमार संघटनांशीही चर्चा करण्यात आली होती. मच्छिमारांच्या विरोधामुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र अखेर एमसीझेडएमएने या पुलाच्या बांधकामाला अटीशर्तींसह मंजूरी दिली आहे. त्यामुळे हा पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलामुळे मार्वे आणि मनोरी या दोन गावातील लोकांना थेट दळणवळणाचा मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यटकांनाही फायदा होणार आहे.

हेही वाचा…आरोग्य विभागाच्या ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात’ ४२ लाख रुग्णांवर उपचार!

पश्चिम उपनगरातील मार्वे, मनोरी, गोराई, उत्तन या बेटांना जोडणारा कोणताही थेट मार्ग नाही. त्यामुळे एकतर बोटीने जावे लागते किंवा शहरातून प्रचंड वाहतूक कोंडीतून जाण्यास एक दोन तास लागतात. त्याकरिता तब्बल २९ किमीचा वळसा घालून जावे लागते. हा वेळ व त्रास नवीन पुलामुळे वाचणार आहे.मार्वे मनोरी दरम्यान बांधण्यात येणारा पूल हा ४१० मीटर लांब असणार आहे. या पुलासाठी मार्वे गावातील काही जमीन लागणार आहे. तसेच कांदळवनातील ४५ झाडे हटवावी लागणार आहेत. त्यामुळे त्या तुलनेत तिप्पट संख्येने खारफुटी लावावी लागणार आहे.

Story img Loader