मुंबईः २६/११ दहशवादी हल्ला असो किंवा मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट असो आपल्या शत्रुंनी नेहमी सागरी सुरक्षेतील त्रुटींचा फायदा उचलला आहे. त्यामुळे समुद्रातील कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या बंदर परिमंडळाने सागर रक्षक ही संकल्पना राबवत असून स्थानिक मच्छीमार व प्रवासी बोटींवर काम करणाऱ्या खलाश्यांची मोठ्या प्रमाणात सागर रक्षक म्हणून नोंदणी करण्यात आली आहे.
यापूर्वी ५४९ सागर रक्षक मुंबई पोलीस दलाला मदत करत होते. पण यावर्षी त्यात विक्रमी वाढ झाली असून १७७५ सागर रक्षक आता मुंबई पोलिसांकडे आहेत. त्यामुळे नारळी पौर्णिमेनंतर समुद्रात मच्छीमारी व प्रवासी बोटी उतरल्यावर मुंबई पोलिसांना अधिक सक्षमरित्या समुद्रातील शत्रुंच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे.
मुंबईचा सागरी किनारा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ला समुद्र मार्गे घुसलेल्या दहशतवाद्यांनी केला होता. याशिवाय १९९३ साखळी स्फोटांमध्येही वापरण्यात आलेले आरडीएक्सही सागरी मार्गानेच भारतात आणण्यात आले होते. त्यामुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्था व नागरिकाच्या सुरक्षाच्या दृष्टीने सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. विशेष करून २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस दलाला अनेक अद्ययावत शस्त्रे व उपकरणे मिळाली. त्यात स्पीड बोटींचाही समावेश आहे.
पण पोलीस दलाच्याही मर्यादा लक्षात घेता समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सागर रक्षकांची नोंदणी करण्यात येऊ लागली. त्यात मच्छीमार, प्रवासी बोटी चालवणारे व्यक्ती, मालवाहू जहाजांवर काम करणारे कर्मचारी यांचा समावेश असतो. यापूर्वी मुंबईत ५४९ सागर रक्षकांची नोंद होती. बंदर परिमंडळाने अधिक मेहनत घेऊन यावर्षी १२४६ अधिक सागर रक्षकांची नोंद केली आहे. सध्या पावसाळ्यामुळे मच्छीमारी बंद आहे. प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर बंद आहे. नारळी पौर्णिमेनंतर त्याला सुरूवात झाल्यानंतर यावर्षी मुंबई पोलिसांचे कान व डोळे असणारे हे सुरक्षा रक्षांची मोठी फळी समुद्रात कार्यरत असेल.
सागर रक्षकांसाठी विशेष प्रयत्न
सागर रक्षकांची संख्या वाढवण्यासाठी बंदर परिमंडळातील पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्या अंतर्गत स्थानिक मच्छीमार, त्यांच्या सोसायट्या, त्यांच्याशी संबंधीत संस्था यांच्याशी मोठ्याप्रमाणात संपर्क साधण्यात आला. त्यांच्याशी संपर्क साधून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे यावर्षी विक्रमी अशी १२४६ सागर रक्षकांची नोंदणी करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. त्या सर्वांना संशयास्पद काही दिसले किंवा त्यांना समजले तर तात्काळ मुंबई पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यावर्षी १२४६ नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सागर रक्षकांची चांगली फळी निर्माण करण्यात आम्हाला यश आले आहे. – विजयकांत सागर, उपायुक्त (बंदर परिमंडळ)