मुंबई : नरिमन पॉईंट परिसरातील एक्स्प्रेस टॉवर आणि पंचतारांकित ट्रायडेंट हॉटेललगतच्या बॅरिस्टर रजनी पटेल मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून या काँक्रीटच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, या रस्त्यावरील काँक्रीटीकरणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाअंतर्गत अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. काँक्रीटीकरणाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत ३१ मेपर्यंत १३८५ रस्त्यांचे ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रीटकरण पूर्ण करण्यात आले आहे. मुंबईत पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेवर टीका होते. त्यामुळे दरवर्षी पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून खड्डे बुजविण्यासाठी निविदा मागवून कंत्राट दिले जाते. दरवर्षी एप्रिल महिन्यात सुरू केली जाणारी निविदा प्रक्रिया यंदा मे महिन्यात सुरू करण्यात आली होती. त्यामुळे यंदा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला पालिकेकडून उशिरा सुरुवात झाली.

विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर ‘तो’ रस्ता

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यावर पालिकेने भर देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे निदर्शनास येत आहे. काही दिवसांपूर्वी चर्चगेट येथील आयकर कार्यालयानजिकच्या महर्षी कर्वे मार्गावर मोठा खड्डा पडला होता. आता नरिमन पॉईंट परिसरातील एक्स्प्रेस टॉवर आणि ट्रायडेंट हॉटेललगतच्या बॅरिस्टर रजनी पटेल मार्गावर खड्डे पडल्याचे दिसून आले आहे.

विधान भवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रस्त्यावर पडलेला खड्डा अद्याप बुजविण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या रस्त्यालाही तडे गेले आहेत. महत्त्वाच्याच्या ठिकाणच्या या रस्त्याची खड्ड्यांमुळे दूरवस्था झाली असून पालिकेचे अद्याप या रस्त्याकडे लक्ष गेलेले नाही. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या ए विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

अन्य ठिकाणचे रस्तेही खड्डेमय

मालाड येथील सुंदर लेन येथील रस्त्यावरही भलेमोठे खड्डे पडले आहेत. बालाजी इंटरनॅशनल शाळेसमोरच हे खड्डे असल्याने शालेय विद्यार्थ्यांना जाता-येताना तारेवरची कसरत करावी लागती आहे. गोवंडीतील डम्पिंग रोडचीही खड्ड्यामुळे दुरवस्था झाली आहे. प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात खड्डे पडल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दहिसर येथे ठाकूर मॉलजवळ पश्चिम द्रुतगती मार्गावरची चाळण झाल्याचे निदर्शनास आले आहे.