मुंबई : जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरले असताना मुंबईत अद्याप अपेक्षित पाऊस पडलेला नाही. मुंबईत जुलै महिन्यात दोन्ही केंद्रांवर एकूण सरासरी १५८९.८ मिमी पावसाची नोंद होणे अपेक्षित आहे. मात्र १६ जुलैपर्यंत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात केवळ १४०.८ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमधील जुलै महिन्यातील पावसाची सरासरी पूर्ण होण्यासाठी सरासरी १२०० मिमीच्या पावसाची आवश्यकता आहे.
जुलै महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. या महिन्यात काही दिवस वगळता हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. परिणामी, मुंबईकर अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला, मात्र जून महिन्यात मुसळधार पडला नाही. अवघ्या दोन – तीन दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जून महिन्याची सरासरी गाठता आली. मात्र, मुंबईकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात कुलाबा केंद्रात ७३४.१ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ८५५.७ मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे. मात्र, १६ जुलैपर्यंत कुलाबा येथे १४०.८ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात २८३ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता नाही. हलक्या ते मध्यम सरी बरसतील. त्यामुळे जुलै महिन्याची सरासरी गाठता येईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त
गेल्यावर्षी जुलै महिन्यात हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १४०१.८ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १७०२.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. कुलाबा आणि सांताक्रूझ केंद्रात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला होता. तसेच मागील पाच वर्षांची हवामान विभागाची आकडेवारी पाहता जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला आहे.
मात्र पाणीसाठा ८० टक्क्यांवर
मुंबईत दिवसभर रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्यापासून आतापर्यंत फारसा मुसळधार पाऊस पडलेला नाही. यापूर्वी मुसळधार पाऊस पडल्यानंतर मुंबईतील रस्ते, रेल्वे मार्ग जलमय होऊन दैनंदिन कारभार ठप्प होत होता. मात्र मुसळधार पावसाअभावी तसा अनुभव अद्याप मुंबईकरांना आलेला नाही. मात्र मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे.