मुंबई : यंदा पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी डांबराच्या गरम मिश्रणाचा अर्थात मास्टिकचाच वापर करण्यात येणार आहे. कोल्डमिक्स आणि पालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षात केलेले सर्व प्रयोग बाजूला ठेवून मास्टिकचा वापर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यादृष्टीने पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच कार्यादेश देण्यात येणार आहेत.

पूर्वी डांबराच्या अतिउष्ण मिश्रणानेच खड्डे बुजविण्यात येत होते. मग काही वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने कोल्डमिक्स म्हणजेच शीत मिश्रणाचा पर्याय आणला. तो पर्यायही बाद ठरल्यानंतर गेल्यावर्षी पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी जिओ पॉलिमर, रॅपिड हार्डनिंग आदी पाच वेगवेगळे प्रयोग केले. यंदा मात्र पालिका प्रशासनात आलेल्या नवीन अधिकाऱ्यांनी हे सर्व प्रयोग बाजूला सारून जुनाच मास्टिकचाच पर्याय वापरण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा – कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती

रस्त्यांचे आधीच सर्वेक्षण करून त्यानुसार खड्डे बुजविण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक परिमंडळासाठी एक कंत्राटदार नेमण्यात येईल. ९ मीटरपेक्षा मोठ्या रस्त्यांसाठी डांबरी मिश्रणाचा पुरवठा आणि ते मिश्रण वाहून नेण्यासाठी प्रत्येक वॉर्डला विशिष्ट प्रकारचे दोन कूकर आणि कामगार असा पुरवठा कंत्राटदाराला करावा लागणार आहे. नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यासाठी एकाच कूकरचा पुरवठा करावा लागेल. मास्टिकचा पुरवठा करणारे कारखाने मोठ्या प्रमाणावर आहेत. फक्त कुकर पुरवणे, त्यातून मिश्रण वाहून नेणे आणि मिश्रण गरम असतानाच खड्डे बुजवणे ही कामगिरी करणे आव्हानात्मक आहे. खड्डे बुजविण्याचे काम रात्री केले जाणार, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खड्ड्यांवरून खडे बोल

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने जानेवारी २०२३ मध्ये सहा हजार कोटींची कामे दिली होती. मात्र त्यातील शहर विभागातील कामे सुरूच झाली नाहीत. उपनगरातील कामे धीम्या गतीने सुरू आहेत. त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते हे स्वप्न दूरच राहिले आहे. त्यातच गेल्याच महिन्यात उच्च न्यायालयानेही पालिका प्रशासनाला खड्ड्यांवरून खडे बोल सुनावले आहेत. गेल्यावर्षीही २७३ कोटी खर्चूनही रस्ते खड्ड्यांतच असल्याबद्दल न्यायालयाने पालिकेला फटकारले होते.

हेही वाचा – परिवहन विभागात घोटाळा, ‘अंधेरी आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे १०० हून अधिक वाहनांची नोंदणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३५६ किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण शिल्लक

मुंबईत एकूण २०५० किमी लांबीचे रस्ते असून आतापर्यंत त्यापैकी १२२४ किमी लांबीच्या रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण झाले आहे. तर ३५६ किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.