मान्सूनच्या वाटेवर डोळे लागलेल्या मुंबईकरांना तापमानानेही दणका दिला आहे. गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ येथे तब्बल ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. बुधवारीही साधारण अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी शतकातील जून महिन्यातील सर्वाधिक तापमान १५ जून १९९५ रोजी ३७.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. साधारण मार्च महिन्यात तापमान वाढत असले आणि ३८ ते ४० अंश से. कमाल तापमानाचीही नोंद होत असली तरी जून महिन्यात कमाल तापमानाची सरासरी ३३ अंशांवर असते. मंगळवारी हे तापमान तब्बल ५ अंश सेल्सियसने वाढले.
मालवणीत व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या
मुंबई : मालवणीत एका ४० वर्षीय व्यापाऱ्याची गोळी मारून हत्या करण्यात आली. शेखर राजम्मा असे त्याचे नाव आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मालवणीत राहणारे राजम्मा शेखर आपल्या १६ वर्षांच्या मुलासमेवत मोटारसायकलीवरून घरी जात होते. मालवणीच्या जनकल्याण बसथांब्याजवळ पल्सर मोटारसायकलीवरून आलेल्या तिघांनी राजम्मा यांच्यावर गोळीबार केला. त्यात त्यांच्या डोक्यावर, कपाळावर आणि उजव्या गालावर जखमा झाल्या. जखमी राजम्मा यांना कांदिवलीच्या आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. राजम्मा यांचा दुकानाच्या मालकीवरून काही जणांशी वाद सुरू होता. या वादाचा या हत्येशी संबंध असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने या प्रकरणी दोन संशयितांना मंगळवारी ताब्यात घेतले आहे.
गाडीतून रिव्हॉल्वर चोरी
मुंबई : पार्किंगमध्ये ठेवलेल्या गाडीतून रिव्हॉल्वर चोरीला गेल्याची घटना सोमवारी संध्याकाळी मुलुंडमध्ये घडली. चोरटय़ाने गाडीची काच फोडून सुटकेस पळविली. त्यात रिव्हॉल्वर होते. उमेश महाडिक (४२) या व्यावसायिकाची गाडी मुलुंडच्या महावीर पार्क येथे उभी होती. संध्याकाळी सातच्या सुमारास अज्ञात चोरटय़ाने गाडीच्या मागची काच तोडून ही सुटकेस लंपास केली. या सुटकेसमध्ये त्यांचे परवाना असलेले पॉइंट ३२ बोअरचे रिव्हॉल्वर, जिवंत काडतुसे, दहा हजार रोख, मालमत्तेसंदर्भातली काही कागदपत्रे आणि मोबाइल होता. याप्रकरणी महाडिक यांच्यावरही निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
बालिकेने काडतूस गिळले
ठाणे : लोकमान्य नगर परिसरात राहणाऱ्या पाच वर्षीय मुलीने रविवारी सायंकाळी भावासह घराबाहेर खेळताना मिळालेल्या दोन जिवंत काडतूसांपैकी एक गिळले. हे काडतूस सुमारे ४० तास या मुलीच्या पोटात होते. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर नैसर्गिक विधीद्वारे ते बाहेर काढण्यात आल़े किशोरी ऐलमरकर असे तिचे नाव असून ती लोकमान्यनगर पाडा नंबर ४ मध्ये राहत़े हा परिसर येऊरच्या लष्करी गोळीबार क्षेत्राच्या जवळ आहे. तिची आई धुणीभांडय़ांची कामे करत़े रविवारी ती जेवण करीत असताना किशोरी मोठा भाऊ सुशांत(१०) याच्यासह बाहेर खेळताना हा प्रकार घडला़
‘चिखलोली’ तळाला
ठाणे : अंबरनाथ पूर्व विभागात पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाने सध्या तळ गाठला आहे. या धरणात जेमतेम १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट करण्यात आले. चिखलोली धरणातून शहराच्या शिवाजीनगर, महालक्ष्मीनगर, वडवली आदी परिसरात प्रतिदिन नऊ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असल्याची माहिती जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता एम.एम. धनपे यांनी दिली. या धरणाची क्षमता २१ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. धरणात मोठय़ा प्रमाणात गाळ साठून राहिल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2014 रोजी प्रकाशित
संक्षिप्त :तप्त जून ;कमाल तापमान ३८ अंशांवर
मान्सूनच्या वाटेवर डोळे लागलेल्या मुंबईकरांना तापमानानेही दणका दिला आहे. गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ येथे तब्बल ३८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
First published on: 11-06-2014 at 01:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai news news in mumbai mumbai city news