मुंबई : वेगवेगळ्या सण – उत्सवांमधील गर्दीचा फायदा घेऊन मोबाइल चोरणाऱ्या टोळीतील एका सराईत चोराला रेल्वेच्या विशेष कृती दलाच्या पथकाने अटक केली. या आरोपीकडून २० लाख रुपयांचे फोन जप्त करण्यात आले असून चोरलेले मोबाइल बांग्लादेश, नेपाळमध्ये विकण्यात येत होते.
एका मोबाइल चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना एक संशयित भायखळा येथे येणार असल्याची माहिती रेल्वेच्या विशेष कृती दलाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून श्याम बरनवाल (३४) या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून २० लाख ८९ हजार रुपये किंमतीचे एकूण ४९ मोबाइल जप्त करण्यात आले. आरोपीविरोधात मुंबईसह ओडिशा, वाराणसी आदी ठिकाणच्या पोलीस ठाण्यात १३ मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या टोळीत किमान सहा ते सात जण असून ते सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
नेपाळ, बांग्लादेशमध्ये मोबाइलची विक्री
या चोरांच्या टोळीच्या कार्यपध्दतीबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित टेलर यांनी सांगितले की, आरोपी प्रामुख्याने रेल्वे परिसर, विविध सण – उत्सव, सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाइलची चोरी करीत होते. पुरी येथील जग्गनाथ यात्रा, कुंभमेळा, वाराणसी घाट आदी ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात मोबाइलची चोरी केली होती.
सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे फोनचा माग काढणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे आरोपी मोबाइल बांग्लादेश, नेपाळ आदी देशांमध्ये विकत होते. तेथे फोन कमी किंमतीत आणि सहज विकता येतात, असे पोलिसांनी सांगितले. लॉक उघडणे शक्य नसलेल्या फोनच्या सुट्या भागांची विक्री केली जात होती.
रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित टेलर, भुपेंद्र टेलर, मंगश खाडे आदींच्या पथकाने या मोबाइल चोरणाऱ्या टोळीतील आरोपीला पकडण्यात यश मिळवले.