मुंबई: कधी आई-वडिल्यांच्या खात्यावरील पैसे गायब तर कधी गुन्हेगारी कटासाठी मुलांच्या ई-मेल आयडीचा वापर, कधी निराशेतून टोकाचे पाऊल असे ऑनलाईन खेळांच्या व्यसनाचे फटके मुलांना आणि पालकांना बसतात. अशाच एका खेळाची भुरळ घालून १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोरेगाव येथे उघडकीस आला आहे. वनराई पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून या मुलीची सुटका केली आहे. तिचे अपहरण करणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पीडित मुलगी १४ वर्षांची असून गोरेगाव येथील एका प्रसिध्द शाळेत ती ९ व्या इयत्तेत शिकते. वनराई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई वडील कामावर जातात. ती घरात एकटीच असते. तिला मोबाईलमध्ये ऑनलाईन खेळ खेळण्याची सवय होती. किशोरवयीन मुलांमध्ये सध्या प्रसिघ्द असलेला ‘फायर गेम’ ती खेळत असे. साधारण ३ महिन्यांपूर्वी या खेळाच्या माध्यमातून तिची ओळख एका तरुणाशी झाली होती. हा तरुण या खेळाद्वारे तिच्यावर नियंत्रण ठेवू लागला. त्यामुळे तो सांगेल तसे ती मुलगी करत होती.
अपहरण कसे झाले? याबाबत माहिती देताना वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले, या खेळात खेळाडूंना वेगवेगळी आव्हाने (टास्क) दिली जातात. त्यानुसार पीडित मुलगी समोरून जो टास्क देईल तो पूर्ण करत होती. त्या मुलीला समोरील व्यक्तीने एक टास्क दिला होता. त्यानुसार तिला गोरेगाव येथील एका कचराभूमीत (डंपिंग ग्राऊंड) जाण्यास सांगण्यात आले. पीडित मुलगी कुणाला न सांगता टास्क पूर्ण करण्यासाठी त्या निर्जन परिसरात गेली होती. तेथे आधीच आलेल्या अज्ञात व्यक्तींनी तिचे अपहरण केले.
प्रकरणाचा तपास कसा झाला? मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पालकांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहऱणाचा गुन्हा दाखल केला. तिच्या मोबाईलवरील कॉल्सचे तपशील (सीडीआर) काढले असता अनोळखी क्रमांक नव्हते. तिच्या मित्रमैत्रणींकडे चौकशी केली असता तिचे कुणाशी प्रेमसंबंध असल्याचेही आढळले नाही. त्यामुळे पोलिसांपुढे अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचे आव्हान होते. दरम्यान, ती एक ‘फायर गेम’ नावाचा ऑनलाईन खेळ खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी माग काढायला सुरवात केली. पोलिसांनी या खेळ निर्मिती कंपनीशी संपर्क साधून तांत्रिक माहिती मिळवली.
पुढील तपासात मुलगी उत्तरप्रदेशातील बनारस येथे असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने बनारस येथे जाऊन मुलीचा शोध घेतला. एका ठिकाणी मुलीला डांबून ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी मुलीची सुटका केली असून तिला मुंबईला आणले आहे. या अपहणामागे एक १८ वर्षांचा तरुण असून आम्ही त्याचा शोध घेत असल्याचे वनराई पोलिसांनी सांगितले. मुलगी प्रचंड मानसिक धक्क्यात असल्याने नेमके अपहरण कसे केले आणि त्या मागे कोण कोण आहे त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता का ते स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले.