मुंबई : गेल्या १० वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात तब्बल ५२ टक्क्यांनी वाढ झाली असून विद्यार्थ्यांवरील खर्चात तब्बल १०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रतिविद्यार्थी एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून प्रतिविद्यार्थ्यांसाठी करण्यात येणारी आर्थिक तरतूद खासगी शाळेतील वार्षिक शुल्काइतकीच आहे. मात्र तरीही अनेक पालक आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत पाठविण्यास तयार होत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मुंबई : मेट्रोच्या कामामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचा २०१२-१३ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प २,१३५ कोटी रुपये होता. तर चालू आर्थिक वर्षात  (२०२२-२३) या विभागाचा अर्थसंकल्प ३२४८ कोटीवर गेला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात प्रतिविद्यार्थी खर्चात तब्बल १०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१२ मध्ये प्रतिविद्यार्थी तरतूद ४९,१२६ रुपये होती, चालू आर्थिक वर्षात ती एक लाख दोन हजार १४३ रुपये झाली असून त्यात १०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महानगरपालिकेच्या शाळांतील प्रतिविद्यार्थांसाठीची तरतूद ही मुंबईतील नावाजलेल्या शाळांतील वार्षिक शुल्काएवढी आहे. मात्र तरीही महानगरपालिकेच्या शाळांतील शिक्षणाच्या दर्जाविषयी पालकांना भरवसा वाटत नाही. ते आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत घालायला तयार नसतात, असे मत प्रजा फाऊंडेशने प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केले आहे. प्रजा फाऊंडेशनने गेल्या १० वर्षांतील मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी संख्येचा आढावा व शाळांच्या सध्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात अनेक त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा >>>मुंबई : ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा : सीएमआरएसच्या चाचण्यांना अखेर सुरुवात ; लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चालू शैक्षणिक वर्षात एक लाख नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे महनगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पाठ थोपटून घेतली होती. मात्र महानगरपालिका शाळांमध्ये दरवर्षी जेवढे विद्यार्थी प्रवेश घेतात त्यापैकी केवळ ४० टक्के विद्यार्थीच या शाळेत दहावीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण करतात, असा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला आहे. महानगरपालिकेने गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. तसेच या शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.  शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थी, शिक्षक यांचे गुणोत्तर ३०ः१ असे असायला हवे. मात्र २०२१-२२ मध्ये मुंबईतील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हे प्रमाण ४१ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

करोनाकाळात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीच नाही

महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी केली जाते. करोनाकाळात आरोग्य तपासणीची सर्वाधिक गरज होती. मात्र या काळात ही तपासणी झालीच नाही, याकडेही या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. तर २०२१-२२ मध्ये एकूण विद्यार्थांपैकी केवळ २६ टक्के विद्यार्थ्यांची तपासणी झाली होती, असेही या अहवालात म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai parents not willing to send their children in municipal schools mumbai print news zws
First published on: 06-12-2022 at 13:24 IST