मुंबई– आम्ही १९ वर्ष न्यायासाठी वाट पाहिली परंतु आजच्या निकालाने आमच्या पदरी निराशा आली. सरकारने योग्य तपास न केल्यानेच आरोपी निर्दोष सुटले, अशी हताश प्रतिक्रिया यशवंत भालेराव यांनी दिली आहे. भालेराव यांचा २३ वर्षाचा मुलगा हर्षल भालेराव याचा मुंबईतील लोकल ट्रेन मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात मृत्यू झाला होता. मुलाची आठवण कायम रहावी यासाठी त्यांनी आपल्या घराला ‘७/११ हर्षल स्मृती’ असे नाव दिले आहे.
निकाल दुर्देवी …
मुंबईतील उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अंधेरीच्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या हर्षल भालेराव (२३) या तरुणाचाही या स्फोटात मृत्यू झाला होता. सोमवारी या प्रकरणाचा अंतिम निकाल असल्याने त्याचे आई वडील सकाळपासून घरात टिव्हीकडे डोळे लावून बसले होते. दहशतवाद्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होईल, अशी त्यांना आशा वाटत होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हा निकाल ऐकून हर्षलचे वडील यशवंत भालेराव निराश झाले आहेत.
‘आम्ही १९ वर्ष न्यायासाठी वाट पाहिली. पण पदरी निराशा आली. हा निकाल ऐकून संताप येतो आहे, असेही ते म्हणाले. पोलिसांनी त्यावेळी घाईघाईने आरोपी पकडले, कसातरी तपास पूर्ण केल्याचे दाखवले. त्यामुळे योग्य पुरावे मिळाले नाहीत आणि परिणामी सर्व दहशतवादी निर्दोष सुटले अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मुंबईवर २६/११ रोजी दहशतवादी हल्ला झाला. त्यातील दहशतवद्यांना फाशीसारखी शिक्षा झाली. आमच्या प्रकरणात मात्र अन्याय झाला. हा निर्णय दुर्दैवी आहे असेही ते म्हणाले.
आईचे डोळे पाणवले..
त्या दिवसांच्या कटू आठणीने हर्षलची आई सगुणा भालेराव यांचे डोळे पाणावले. त्या दिवशी बॉम्बस्फोटाची बातमी टिव्हीवरून समजली तेव्हा काळजात धस्स झालं होते. कारण त्याच वेळेला हर्षल ट्रेन मधून येणार होता. त्या ट्रेन मध्ये हर्षल नसू दे अशी मी मनोमन प्रार्थना करत होते. हर्षलचा फोन लागत नव्हता. परंतु नको तेच घडलं असं त्या म्हणाल्या. ते सांगताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. माझा मुलगा परत मिळणार नाही. पण दहशतवाद्यांना शिक्षा मिळायला हवी होती, असे मृत हर्षलच्या आईने सांगितले.
मुलाच्या आठवणीसाठी घराला ‘७/११ हर्षल स्मृती’ नाव
हर्षल याने पदवीनंतर संगणकाचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. अंधेरी येथील कंपनीत तो कामाला लागला होता. ११ जुलै हा त्याच्या कामाचा पहिला दिवस होता. त्याच्या वडिलांनी आदल्या दिवशी त्याला नवीन पांढऱ्या रंगाचे शूज विकत घेऊन दिले होते. पहिल्यात दिवशी कामावरून परतत असताना रेल्वेत स्फोट झाला आणि त्याचा मृत्यू झाला. योगायोग म्हणजे त्याच दिवशी हर्षलचे वडील यशवंत भालेराव हे देखील त्याच ट्रेनमध्ये द्वितीय श्रेणीच्या वर्गात होते. मुलाच्या दु:खाने भालेराव कुटुंबिय कोलमडून गेले होते. मुलाची स्मृती कायम रहावी यासाठी त्यांना आपल्या वसईच्या चुळणे गावातील नव्या घराला ‘७/११ हर्षल स्मृती’ असे नाव दिले आहे.