मुंबई : खिडकीतून घरात शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ३१ वर्षीय आरोपीला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. आरोपीने पीडित मुलीवर दोन वेळा जबरदस्ती केली होती. त्यामुळे अखेर तिने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
१७ वर्षांची पीडित मुलगी शिक्षण घेत असून कुटुंबियांसोबत राहते. तिला दोन लहान भाऊ आहेत. पीडित मुलगी १० मे रोजी घरातील पोटमाळ्यावर झोपली होती. त्यावेळी आरोपीने खिडकीतून घरात प्रवेश केला. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केला. तसेच तिला धमकावले. त्यावेळी पीडित मुलीच्या वडिलांना हा प्रकार समजला. पण मुलीची बदनामी होईल या भितीमुळे त्यांनी याबाबत कोणतीही तक्रार केली नाही.
पण त्यानंतरही आरोपीने पीडत मुलीवर जबरदस्ती केल्यामुळे ती घाबरली होती. आरोपी पुन्हा आपल्यावर जबदस्ती करेल, या भीतीने अखेर पीडित मुलीने याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (ड) व ३५१ (२) व पोक्सो कायदा कलम ४ व ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी ३१ वर्षीय आरोपीला राहत्या परिसरातून अटक केली. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.