मुंबईः साडेपाच लाख रुपयांत बाळाच्या विक्रीचा प्रयत्न फसला असून याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी सतर्कता दाखवून दोन महिलांना अटक केली. याप्रकरणी पाच आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तक्रारदार मयुरी वन्नम या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांना एक गर्भवती महिला प्रसुतीनंतर तिच्या बालकाची चार लाख रुपयांमध्ये विक्री करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या बालकासाठी आरोपी समीर शेखने ५० हजार रुपयांची मागणी केली. पण तक्रारदार महिलेने त्याला १० हजार रुपये आगाऊ दिले. त्यांनतर आरोपींनी संबंधीत महिलेची १ ऑगस्टला शिवाजी नगर येथे महिलेची प्रसुती झाल्याच्या नोंदी दाखवल्या.

त्या बालकाच्या विक्रीसाठी त्यांच्याकडे साडेपाच लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यावेळी बालकाची विक्री करण्यासाठी नजिमा अस्लम शेख व फातिमा मेहमुदअली या दोन महिला आल्या होत्या. अखेर पोलिसांनी सापळा रचून रफीक नगर येथून त्यांना अटक केली. याप्रकरणी दोन महिलांसह समीर शेख, सुमया खान व इरफान खान यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.