मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल समाज माध्यमांवर अपशब्दांचा वापर करणाऱ्या २८ वर्षीय तरूणाला अंधेरी येथील एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. व्हॉट्सॲपवर हा प्रकार झाला असून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अंधेरीतील कोडीविटा गाव येथील रहिवासी असलेल्या सुजीत जयप्रकार दुबे या उत्तर भारतीय तरूणाने राज ठाकरे यांचे नाव घेत शिवीगाळ केली आहे. शिवीगाळ केल्याचा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुजित दुबे असे राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीयाचे नाव आहे.

दरम्यान, सुजित दुबे याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ समोर येताच मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. हा व्हिडीओ व्हॉट्सॲपवर पाहणाऱ्या ॲन्थोनी डिसोझा यांंनी याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी सायंकाळी दुबेविरोधात गुन्हा दाखल केला होता. भारतीय न्याय संहिता कलम १९६(१), २९६, ३५१, ३५२, ३५६(२) अंतर्गत दोन समजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर शनिवारी रात्री १० च्या सुमारास दुबेला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

दुबेच्या दुचाकीची तोडफोड

मिळालेल्या माहितीनुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सुजित दुबे यांच्या दुकानाची तोडफोड केली आहे. तसेच दुबे याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. हे प्रकरण समोर येताच अंधेरी एमआयडीसीच्या पोलिसांनी दुबे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. तक्रारदार स्वतः एमआयडीसी पोलीस ठाण्यात आले व त्यांनी आरोपी दुबेविरोधात तक्रार केल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरीकडे दुबे याच्या दुकानाची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे कार्यकर्ते आक्रमक

सुजित दुबे याने दारुच्या नशेत राज ठाकरे यांचा उल्लेख करत शिवीगाळ केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, आता ही ध्वनिचित्रफीत प्रसारित झाल्यानंतर राज ठाकरेंचे कार्यकर्ते संतप्त झाले असून वाद वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी मिरा रोड परिसरात मराठी- अमराठी वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती अंधेरी परिसरात होऊ नये, यासाठी पोलीस काळजी घेत असून अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.