मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला अंधेरीत बॉम्ब ठेवल्याची धमकी शुक्रवारी पहाटे प्राप्त झाली. या घटनेनंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून तात्काळ शोध मोहीम हाती घेण्यात आली. तसेच याप्रकरणी एका १९ वर्षीय तरूणाला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, शोध मोहिमेत काहीच संशयास्पद सापडले नाही.
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी पहाटे धमकीचा दूरध्वनी आला. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षातील महिला पोलीस शिपायाने दूरध्वनी उचलला. अंधेरीतील मुकुंद नगर येथील मरोळ पाईप लाईन जवळील अनमोल अपार्टमेंटमध्ये बॅग आहे. त्या बॅगमध्ये बॉम्ब अथवा शस्त्र ठेवले आहे. ते तेथून लवकर येथून हटवा, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. त्यामुळे महिला पोलिसाने तात्काळ याबाबतीच माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले.
संशयीत ताब्यात
दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या पत्त्यावर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी एका १९ वर्षीय तरूणाला संशयावरून ताब्यात घेतले. कुटुंबियांची चौकशी केली असता त्या तरूणाला ऑटीझम आजार असून तो काहीही बडबडतो, असे त्यांनी सांगितले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली असता बॉम्ब अथवा शस्त्र सापडले नाही.
अफवांचे पेव
गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांना नाहक त्रास
पोलिसांना सुरक्षा, बंदोबस्त, तपास कामासह अशा अफवांनाही नेहमी सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर अनेक मिसकॉलही येत असतात. ते नेमके कोणाकडून आले, हे पडताळण्यासाठी त्यावर पुन्हा दूरध्वनी केल्यावरही अजब उत्तरे ऐकायला मिळतात. अनेक जण दूरध्वनी सुरू आहेत का, याची खात्री करण्यासाठी दूरध्वनी करतात. वैयक्तीक वाद, आर्थिक वाद, प्रेमप्रकरणे यातून एकमेकांना अडवकण्यासाठीही दूरध्वनी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीनंतही पोलिसांना नियमित येणाऱ्या सर्व दूरध्वनींची पडताळणी करावी लागते. प्रश्न सुरक्षेचा असल्यामुळे त्याबाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. त्यामुळे तपासासोबत सुरक्षा यंत्रणांना अशा अफवांचाही तपास करावा लागतो. त्यामुळे या अफवा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.