मुंबई : १७ मुलांना ओलीस ठेवणारा रोहीत आर्य पोलीस चकमकीत ठार झाला. मुंबईत १७ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक ओलीस नाट्य रंगले होते. बिहारमधील राहुल राज या २५ वर्षीय तरुणाने ऑक्टोबर २००८ रोजी कुर्ला येथे बेस्ट बसमधील प्रवाशांना ओलीस धरले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मारण्यासाठी तो आला होता. अर्ध्या तासांच्या नाट्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला होता.
दहशतवाद्यांकडून सर्वसामान्य नागरिकांना ओलीस ठेवून आपल्या मागण्या मान्य केला जातात. परंतु माथेफिरूही नागरिकांना ओलीस ठेवले जात आहे. मुंबईत १७ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक ओलीस नाट्य रंगले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरूद्ध मोहीम चालवली होती. राज ठाकरे यांना प्रक्षोभक भाषणांच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांवर हल्ले केले होेते. रेल्वे भरती परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय तरुणांवरही हल्ले झाले. यामुळे बिहारमधील कुंदनसिह उर्फ राहुल राज (२५) संतप्त झाला होता. त्याने देशी कट्टा मिळवला आणि राज ठाकरे यांना मारण्यासाठी तो मुंबईत आला होता.
बसमधील प्रवाशांना ओलीस ठेवले…
साकीनाका येथून ३३२ क्रमांकाची दुमजली (डबल डेकर) बस पकडून राहुल कुर्ला येथे आला. काही प्रवासी बसमधून उतरले. त्यावेळी सकाळचे साडेदहा वाजले होते. अचानक राहुलने बंदूक काढून प्रवाशांना धमकावले आणि बसचा ताबा घेतला. वरच्या मजल्यावर १७ प्रवाशांना ओलीस ठेवले. मी प्रवाशांना मारणार नाही, मला फक्त राज ठाकरेला संपवायचे आहे, असे तो सांगत होता. या ओलीस नाट्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी बसला वेढा घातला. त्यामुळे तो बिथरला. पोलीस जवळ येताना पाहून त्याने हवेत गोळीबार सुरू केला. एक गोळी प्रवाशाला लागली आणि तो प्रवासी जखमी झाला होता.
पोलीस चकमकीत ठार
सहाय्यक पोलीस आयुक्त मोहमद जावेद त्यावेळी घटनास्थळी सर्वात पुढे होते. ते बसमध्ये शिरले, तेव्हा राहुल राज एका प्रवाशाला धरून बंदूक रोखून उभा होता. जावेद यांनी त्याला शरण येण्यास सांगितले. पण राहुल राज राज ठाकरेला संपवायचे आहे” असे तो ओरडत होता. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने जावेद यांनी प्रथम गोळी झाडली आणि नंतर पथकातील इतर पोलिसांनी गोळीबार केला. एकूण १० ते १२ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी तीन गोळ्या राहुलच्या डोक्यात आणि एक हृदयात लागली. राहुल राज घटनास्थळीच ठार झाला.
