मुंबई : वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करीत चकमा देणाऱ्या चोराला अखेर तंत्रज्ञानाच्या साह्याने गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. अंधेरी स्थानाकातील चेहरा ओळख प्रणाली असलेल्या कॅमेर्यात तो कैद झाला, नंतर ई वाहन पोर्टलद्वारे माहिती मिळवून पोलिसांनी त्याला गजाआड केले.

मालाडच्या रत्नकला सराफ दुकानात २८ एप्रिल रोजी चोरी झाली होती. एका अज्ञात चोराने वातानुकूलीत यंत्रणेच्या (एसी) खिडकीतून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील सुमारे ५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले. मात्र रात्रीची वेळ असल्याने आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा मागोवा घेण्यासाठी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले. चोरी केल्यानंतर चोराने मालाड – अंधेरीदरम्यान लोकलमधून प्रवास केला. तेथून तो मेट्रोने असल्फा व्हिलेजला गेला. पुढे बस आणि मग रिक्षाने तो पसार झाला होता. तो याच मार्गाने आल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी पुन्हा सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासले. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी सतत कपडे बदलत असल्याचे लक्षात आले. सतत कपडे बदलणाऱ्या चोराच्या पायातील चप्पल मात्र एकच असल्याचे पोलिसांनी हेरले. हा तोच आरोपी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

चेहरा ओळख प्रणालीत झाला कैद

अंधेरी स्थानकात चेहरा ओळख प्रणालीचा कॅमेरा (फेस रेक्गनेशन सिस्टिम – एफआरएस) बसविण्यात आला होता. अभिलेखावरील गुन्हेगार या प्रणालीद्वारे ओळखता येतो. स्थानकातून जात असलेल्या आरोपीचा चेहरा या प्रणालीत कैद झाला. त्याचे छायाचित्र सर्व पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. हा आरोपी वर्सोवा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे आढळून आले. एका घरफोडी प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होता. त्यावरून त्याची ओळख पटली. आरोपीचे नाव मुकीन खान (३०) असून तो घाटकोपर येथे वास्तव्यास असून तो फॅब्रिकेटरचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ई-परिवहन पोर्टलद्वारे लावला छडा

आरोपीची ओळख पटली आणि त्याचा मोबाइल क्रमांक पोलिसांना मिळाला. मात्र मुकीन खान हा मोबाइल वापरत नव्हता. पोलीस त्याच्या उत्तर प्रदेशीतल सिध्दार्थ नगर जिल्ह्यातील पवनीनगर गावातही जाऊन आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल क्रमांक ई परिवहन पोर्टलवर टाकून पाहिला. त्या क्रमांकावर एक मोटारसायकल नोंदणीकृत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी माहिती मिळवून मुकीन खानच्या मुसक्या आवळल्या. त्याने चोरीची कबुली दिली. चोरलेल्या रकमेतून त्याने २ लाखांची महागडी दुचाकी विकत घेतल्याचे त्याने सांगितले. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पन्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रेवाडे, पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेव आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.