गुरुवारी संध्याकाळपर्यंत राजीनाम्याच्या बातमीचा इन्कार करणारे मुंबईच पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी त्याच दिवशी रात्री उशीरा आयुक्तपदाचा राजीनामा दिला. ‘अंत:करणाचा आतला आवाज ऐकून आवाज ऐकून देशसेवेसाठी मी राजीनाम्याचा निर्णय घेतला’ असे कारण त्यांनी दिले. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी गुरूवारी रात्री राजीनामा दिल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पदावर असताना राजीनामा देणारे ते पहिले आयपीएस अधिकारी ठरले आहेत. आपल्या राजीनाम्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मी पोलीस खात्यात राहून जनतेची सेवा केली आहे. आता मला व्यापक स्वरूपात देशसेवा करायची आहे. माझ्या अंत:करणाने दिलेल्या हाकेस प्रतिसाद म्हणून मी राजीनामा दिला आहे. पोलीस महासंचालक पद मिळाले नाही म्हणून राजीनामा दिला हे वृत्त निराधार आणि तथ्यहिन असल्याचेही ते म्हणाले. अनेक राजकीय पक्षाचे प्रस्ताव आले असून भारतीय जनता पक्ष किंवा आम आदमी पक्षात जायचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे ते म्हणाले. येत्या दोन दिवसात पुढील निर्णय जाहीर करू असेही ते म्हणाले. २०१५ साली सिंग हे सेवानिवृत्त होणार होते. उत्तर प्रदेशातल्या मारूत जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले सिंग १९८० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. रसायन शास्त्रात पदवीधर असलेल्या सिंग यांनी एमबीए आणि डॉक्टरेटचीही पदवी संपादन केली आहे. ऑस्ट्रेलियातूनही त्यांनी एमबीएची पदवी संपादन केली होती.
दरम्यान, सिंग यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या आयुक्तपदाचा हंगामी कार्यभार सहपोलीस आयुक्त हेमंद नगराळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.