मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सोमवारी शहरातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, वाहतूक समस्या आणि पोलीस दलातील तांत्रिक बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. आजही मुंबईला असलेला दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्राथमिकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सायबर गुन्हेगारी व अमली पदार्थांचे आव्हान कायम असल्याचे सांगत आहे. गेल्या दोन वर्षांत मुंबई सायबर विभागाने नागरिकांचे ३०० कोटी वाचवले आणि अनेक आरोपींना अटक केली. मुंबईमध्ये सायबर फसवणुकीबाबत नागरिकांकडून दररोज दोन हजारांहून अधिक दूरध्वनी येतात. यात प्रतिदिन सुमारे ६० लाख रुपये गोठवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीला आजही दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम आहे. सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, प्रतिबंधात्मक उपाययोजना सतत सुरू आहेत.मुंबईत शहरी नक्षलवाद्यांचे अस्तित्व नाकारता येत नाही. विशेष पथक दररोज यावर लक्ष ठेऊन आहे. तसेच, बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात येत असून गेल्या काही महिन्यांमध्ये एक हजारांहून अधिक बांगलादेशी नागरिकांना हद्दपार करण्यात आल्याची माहिती देवेन भारती यांनी यावेळी दिली. गेल्या अनेक दशकांपासून मुंबईत सुरू असलेली अमली पदार्थांची तस्करी, सध्या वाढत असलेले सायबर गुन्ह्यांचे प्रमाण पोलीस दलासाठी एक आव्हान आहे. अमली पदार्थांची तस्करी, खरेदी – विक्री रोखणे आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महिला सुरक्षेकडे अधिक भर देणार येत असल्याचेही भारती यांनी सांगितले.
मुंबईतील वाढत्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्याचे उपाय करण्यात येत आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांना बदलीमध्ये सर्वाधिक संख्याबळ देण्यात आले. मुंबईतील वाहतुकीची परिस्थिती, भौगोलिक स्थिती आणि सुरू असलेली कामे इत्यादींमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेसोबत चर्चा करून उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई पोलीस आयुक्तालयातही फेशियल रिकग्नेशन सिस्टीम बसविण्यात येणार आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी, तसेच आयुक्तालय अधिक सुरक्षित आणि अद्यावत करण्यासाठी हे बदल करण्यात येत आहेत. यामुळे आता पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रवेश मिळणार नाही, असे भारती यांनी सांगितले.
हजाराहून अधिक बांगलादेशींवर कारवाई
बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात धडक मोहीम सुरू असून गेल्या तीन महिन्यांत जवळपास १ हजार बांगलादेशींना पुन्हा त्यांच्या देशात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. वेगवेगळ्या हद्दीत लपून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचेही देवेन भारती यांनी स्पष्ट केले.