१५ दिवसांत महिलेने ३८ वेळा दूरध्वनी केले

मुंबई : आगामी काळात येणाऱ्या सणांमध्ये सुरक्षेसाठी मुंबई पोलीस नियोजन करीत असताना त्यांना नियमित बॉम्बस्फोटाबाबतची खोटी माहिती देणारे दूरध्वनी येत आहेत. गेल्या २४ तासांत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्ब ठेवल्याबाबत दोन दूरध्वनी आले. त्यातील एक दूरध्वनी करणाऱ्या महिलेने १५ दिवसांमध्ये ३८ दूरध्वनी केल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा >>> सीबीएसई शाळांची संख्या वाढविण्याचा मुंबई महानगरपालिकेचा संकल्प

मुंबई पोलिसांना सोमवारी एका महिलेचा दूरध्वनी आला होता. त्यात तिने कुलाबा व नेपअन्सी रोडवर बॉम्ब ठेवल्याचा दावा केला आणि पोलिसांची मदत घेतली. या महिलेने इंग्रजी भाषेत माहिती दिली होती. या महिलेने गेल्या १५ दिवसांमध्ये ३८ वेळा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. त्या महिलेला तिची तक्रार विचारली असता ती कोणतीही माहिती देत नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ती महिला मलबार हिल पोलिसांच्या हद्दीत राहणारी असून ती परदेशात जाणार असल्याचे समजले. या महिलेशिवाय सोमवारी आणखी एकाने दूरध्वनी करून कामाठीपुरा गल्ली क्रमांक १२ मध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. रात्री १०.३० च्या सुमारास शहरातील दोन भागात बॉम्ब ठेवल्याचे वृत्त आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तसेच सर्व यंत्रणांना याबाबती माहिती दिली. दूरध्वनीमध्ये देण्यात आलेल्या माहितीची शाहनिशा केली असता कोणतीही संशयीत वस्तू सापडली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा >>> मुंबई: आयटीआयचे प्रवेश अर्ज ६ सप्टेंबरपर्यंत भरता येणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पोलिसांना गेल्या पाच महिन्यांमध्ये खोटी माहिती देणारे अथवा धमकीचे ८० हून अधिक दूरध्वनी आले आहेत. गेल्या आठवड्यात मंत्रालयात बॅाम्ब ठेवल्याचा निनावी दूरध्वनी ११२ क्रमांकाच्या मदत क्रमांकावर आला होता. निनावी दूरध्वनी करून आरोपीने मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली. निनावी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून देण्याची इच्छा केली व्यक्त केली. बोलणे करून दिले नाही, तर बॅाम्बद्वारे मंत्रालय उडवून देण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर मंत्रालयात बॅाम्बशोध पथक दाखल झाले. त्यांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळील परिसराची विशेष तपासणी केली. नागरिकांनाही तेथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. सुमारे दीड तास तपासणी केलानंतर मंत्रालयात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. याप्रकरणी पाथर्डी येथून एका संशयीताला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले होते.