मुंबई : हास्य कलाकार कपिल शर्माला मुंबई पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शर्माच्या कॅनडातील ‘कॅप्स कॅफे’ नावाच्या हॉटेलवर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. कपिल शर्माने कॅनडात कॅफे सुरू केले होते. या कॅफेवर १० जुलै रोजी प्रथम गोळीबार झाला होता. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा हल्ला झाला.

मुंबई पोलिसांनी गोळीबारानंतर ओशिवरा येथील कपिल शर्माच्या निवासस्थानी जाऊन अधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली. या दरम्यान त्याला कोणी धमकी दिली होती का? याचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कपिलला सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. शर्माला सुरक्षा पुरवल्याच्या वृत्ताला पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दुजोरा दिला आहे.