मुंबई : गेल्या वर्षभरात पूर्व उपनगरांतील विविध पोलीस ठाण्यांत विविध गुन्ह्यांमध्ये अनेकांचे दागिने, रोकड आणि मोबाइल चोरीला गेले होते. या सर्वांचा शोध घेऊन परिमंडळ ७ च्या पथकाने मूळ मालकांना मुद्देमाल परत केला. मुलुंड येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात अप्पर पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी संबंधितांना हा मुद्देमाल सुपूर्द केला.

गेल्या वर्षभरात पूर्व उपनगरांतील परिमंडळ ७ अंतर्गत येणाऱ्या घाटकोपर, विक्रोळी, पार्क साईट, कांजूरमार्ग, नवघर, मुलुंड आणि भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांचे दागिने, रोकड आणि मोबाइल चोरीला गेले होते. याबाबत विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी याबाबत एक पथक तयार करून चोरी गेलेल्या मुद्देमालाचा तत्काळ तपास करण्याचे आदेश पथकाला दिले होते. त्यानुसार या पथकाने विविध राज्यात जाऊन अनेक आरोपीना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हे देखील उघडकीस आले आहेत.

तपासानंतर पोलिसांनी मूळ मालकांना त्यांचा मुद्देमाल परत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी मुलुंड येथील एम.सी.सी. महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ५२ लाख लाख रुपये किंमतीचे हरवलेले आणि चोरीला गेलेले ३५९ मोबाइल, तसेच ३६ वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील सोन्याचे दागिने, रोकड आणि इतर वस्तू असा एक कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्या उपस्थितीत संबंधित नागरिकांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. या वेळी पोलिसांकडून मुद्देमाल, मोबाइल आणि किमती वस्तूंची कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.