जवळपास १४ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मधल्या काळात अनेकदा मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देणारे संदेश पोलीस किंवा तपास यंत्रणांकडे आले आहेत. चौकशीअंती यातले बहुतेक संदेश कुणा माथेफिरूकडून आल्याचं निष्पन्न झालं. मात्र, तरीदेखील अशा प्रत्येक संदेशाची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी केली जाते. शनिवारी सकाळी पुन्हा एकदा असाच एक संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरल आला. दोनच दिवसांपूर्वी रायगडमधील श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर बोट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर या संदेशाची गंभीर दखल तपास यंत्रणांनी घेतली आहे.

पाकिस्तानमधील क्रमांकावरून आला संदेश!

“मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आला आहे. हा संदेश पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूण ६ जण हा हल्ला करणार असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. यासंदर्भातला तपास सुरू आहे”, अशी माहिती मुंबई पोलिसातील सूत्रांनी दिल्याचं ट्वीट एएनआयनं केलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा संदेश गांभीर्याने घेण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. “अशा प्रकारच्या धमक्या अनेकदा येत असतात. मुकेश अंबानींच्या कुटुंबालादेखील धमकी आली. खोलात गेल्यानंतर काही माथेफिरूंनी धमकी दिल्याचं लक्षात आलं. आज मुंबईला आलेली धमकी गांभीर्याने घेतली गेलीच पाहिजे. आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे. केंद्रीय यंत्रणांनीही त्यात लक्ष द्यावं”, असं अजित पवार म्हणाले. ते अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीवर्धनमध्ये सापडलेल्या बोटीचं ऑस्ट्रेलिया कनेक्शन!

१८ ऑगस्ट २०२२ रोजी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धमधील हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर एक १६ मीटर लांबीची बोट दुर्घटनाग्रस्त अवस्थेत स्थानिक मच्छिमारांना आढळून आली. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना यासंदर्भात कळविल्यानंतर त्या बोटीची पूर्ण तपासणी करण्यात आली. त्यावेळी या बोटीमध्ये तीन एके ४७ रायफल्स आणि दारुगोळा तसेच बोटीशी संबंधित कागदपत्रे आढळून आली. ही घटना निदर्शनास येताच तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देशण्यात आले होते. गृहमंत्र्यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये या बोटीसंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली असून ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिकाच्या मालकीची असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.