Mumbai Powercut : फडणवीसांनी साधला महाविकास आघाडीवर निशाणा, म्हणाले…

सामान्य माणसाच्या आयुष्यात अचानक बसलेल्या या धक्क्यासाठी जबाबदार कोण? असा प्रश्न देखील केला.

संग्रहीत छायाचित्र

मुंबईबरोबरच ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागांमध्ये आज सकाळपासून वीज पुरवठा खंडित झाला होता, तो दुपारनंतर पूर्ववत झाला. मात्र, याचा परिणाम मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलसह सर्वच गोष्टींवर झाल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे सामान्य माणसाला मनस्तापही झाला, चाकरमान्यांची धावपळ झाली. करोना काळात घडेलेल्या या प्रकारामुळे राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यातील महाविकासआघाडी सरकावर निशाणा साधला आहे.

”संपूर्ण मुंबईला आज वीजेअभावी मोठा फटका बसला आणि विशेषत: कोरोनाच्या कालखंडात तर हा फटका आणखी गंभीर बनला. सर्वसामान्यांच्या जीवनात खंड पाडणार्‍या आणि यामुळे जवळजवळ संपूर्ण मुंबई ठप्प करण्यासाठी जबाबदार कोण? आतातरी महाविकास आघाडीचे सरकार स्वत:हून पुढाकार घेऊन पुन्हा अशी परिस्थिती उदभवू नये, यासाठी पाऊले टाकेल का? अशी अपेक्षा आपल्याला आता तरी करता येईल का? रेल्वे, दवाखाने, पाणीपुरवठा अशा सर्वच सुविधा ठप्प पडल्या होत्या. या प्रकाराच्या चौकशीतून काहीतरी निष्पन्न निघेल आणि याची जबाबदारी संबंधितांवर निश्चित केली जाईल, अशी आशा करू या!” असं त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

आणखी वाचा- राज्य सरकार नियोजनशून्य, व्यवहारशून्य आणि कल्पनाशून्य – शेलार

आणखी वाचा- मुंबईत वीज पुरवठा खंडीत ! अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोकलचा खोळंबा झाला व चाकरमान्यांना याचा फटका बसला. याचबरोबर विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने हाल झाले. यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शिवाय, उर्जामंत्र्यांनी तातडीने याबाबत खुलासा करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

आणखी वाचा- …आता फक्त एलियन दिसायचे राहिले आहेत, ते ही दिसतील! नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

”राज्य सरकार नियोजनशून्य, व्यवहारशून्य आणि कल्पनाशून्य असल्याने आज विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने हाल झाले. याबाबत ज्या अधिकाऱ्यांचे नियोजन चुकले त्यांच्यावर कारवाई करा. उर्जामंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा.” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai powercut fadnavis criticized the mahavikas aghadi government said