मुंबई : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर पथकर नाक्यालगतच्या ट्रक टर्मिनलची जागा ट्रक उभे करण्यासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे ट्रक महामार्गावर, रस्त्यावर उभे करण्यात येत असून त्यामुळे खालापूर पथकर नाक्यालगत वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ट्रक टर्मिनलचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हे विस्तारीकरण झाल्यास महामार्गावर ट्रक उभे राहणार नाहीत आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.

द्रुतगती महामार्गावरुन मोठ्या संख्येने ट्रकची वाहतूक होते. ट्रक चालकांना अनेकदा मुक्काम करावा लागतो. यासाठी महामार्गावर खालापूर पथकर नाक्यालगत ट्रक टर्मिनल उभारण्यात आले आहे. हे ट्रक टर्मिनल १५ हजार चौरस मीटर जागेवर उभारण्यात आले असून ट्रकची वाढती संख्या लक्षात घेता ते अपुरे पडू लागले आहे. परिणामी अनेक ट्रकचालक ट्रक महामार्गावर, रस्त्यावर उभे करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते, वाहनांना अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आता एमएसआरडीसीने या ट्रक टर्मिनलचा विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले. यासंबंधीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महामंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. या प्रस्तावानुसार ट्रक टर्मिनलचा विस्तार करण्यात येणार असून यासाठी एमएसआरडीसी ३९ हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून देणार आहे.

हेही वाचा >>>मुंबईमध्ये फेब्रुवारीत ११ हजार ८३६ घरांची विक्री, मागील १२ वर्षांतील फेब्रुवारीमधील सर्वाधिक घरविक्री

खालापूर येथील फुड प्लाझाच्या कंत्राटदाराला ही जागा उपलब्ध करून दिली जाणार असून विस्तारीकरणाचे काम हा कंत्राटदार करणार आहे. त्या मोबदल्यात एमएसआरडीसीला ३३ कोटी रुपये आणि वाहनतळाच्या महसुलातील ५० टक्के रक्कम मिळणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. ट्रक टर्मिनलचा विस्तार झाल्यास खालापूर येथील वाहतूक सुरळीत होईल आणिन वाहनचालक – प्रवाशांना दिलासा मिळू शकेल, असा दावा करण्यात येत आहे.