मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी मुंबई व ठाण्यातून बसेस तसेच खासगी गाडय़ा मोठय़ा प्रमाणात गेल्या. या गाडय़ांवर मनसेचे झेंडे बघून मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेसह कोणत्याही टोल नाक्यावर एकाही गाडीकडून टोल मागण्यात आला नाही. ‘मुंबई-पुणे-मुंबई मनसेची गाडी चाले टोल फ्री’ अशा घोषणा देतच मनसेचे कार्यकर्ते आपापल्या गाडय़ांमधून जाताना दिसत होते. नवी मुंबईमधील मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राज यांनी टोल न भरण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. टोलवसुलीचा प्रयत्न केल्यास त्याला फटकवा, असा थेट आदेश राज यांनी दिल्यानंतर राज्यभरातील अनेक टोल नाके मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. अजित पवार आणि आर. आर. पाटील यांनी तोडफोडीचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला. मनसेने आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्याचेच प्रत्यंतर राज यांच्या पुण्यातील सभेनिमित्त रविवारी पाहावयास मिळाले. मुंबईतून मनसेच्या कार्यकर्त्यांनी भरलेल्या गाडय़ा पुण्याला रवाना झाल्या आणि वाटेतील एकाही टोल नाक्यावर टोल भरण्यात आला नाही, असे मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Feb 2014 रोजी प्रकाशित
मुंबई-पुणे-मुंबई मनसेचा टोल फ्री उपक्रम!
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसाठी मुंबई व ठाण्यातून बसेस तसेच खासगी गाडय़ा मोठय़ा प्रमाणात गेल्या.
First published on: 10-02-2014 at 12:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai pune mumbai toll free initiative by mns