मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून, रस्ते वाहतुकही विस्कळीत झाली आहे. राज्य सरकारनेही सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावासमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान कुर्ला परिसरात अडकलेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी भारतीय नौदल रस्त्यावर उतरलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सतत सुरु असलेल्या पावसामुळे सखल ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबई महापालिकेने भारतीय नौदलाला बचावकार्यात मदत करण्यासाठी विनंती केली होती. यानंतर कुर्ला परिसरात अडकलेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाचे जवान रस्त्यावर उतरले असून मदत करत आहेत. बचावकार्यासाठी आयएनएस तानाजी आणि होड्या, शिड्या, दोरी अशा गरजेच्या गोष्टी उपलब्ध करुन देण्यासाठी उपकरण व्यवस्थापन टीम तात्काळ सक्रीय झाली आहे. यानंतर डायव्हिंग टीमने त्यांच्यासोबत काम सुरु केलं आहे.

मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, १००० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं

सखल ठिकाणी जिथे पाणी साचलं आहे तसंच वाहनं अडकली आहेत त्या ठिकाणी आयनएस तानाजीची टीम पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. अशा ठिकाणी आपली वाहनं नेणं टीम टाळत आहे. यासाठी पायी चालत तसंच सुरक्षेसाठी लाईफ जॅकेटचा वापर केला जात आहे. काही वयस्कर महिला आणि लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात टीमला यश आलं आहे.

दरम्यान एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि नौदलाच्या मदतीने १००० लोकांनी सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. यामध्ये स्थानिक लोकांचीही मदत मिळत आहे. दरम्यान भारतीय नौदल मदतीसाठी पुर्णपणे सज्ज असून गरज भासेल त्याप्रमाणे कार्यरत असणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai rain indian navy ins tanaji material organisation rescue sgy
First published on: 02-07-2019 at 09:53 IST