मुंबई : मुंबई शहर, तसेच उपनगरात शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर तसेच कोकण किनारपट्टीवर शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गेले काही दिवस मुंबईत, तसेच राज्यातील इतर भागात पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या. मात्र, फारसा पावसाचा जोर नव्हता. त्यानंतर मुंबई शहर तसेच उपनगरात आणि राज्याच्या इतर काही भागात शुक्रवारी पहाटेपासून पावसाने जोर धरला. अनेक भागात वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बोरिवली, अंधेरी, वांद्रे ,परळ, वरळी, भायखळा, कुलाबा परिसरात पावसाचा जोर अधिक होता. याचबरोबर कोकण किनारपट्टीवर देखील पावसाचा जोर होता.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान ३२.२ मिमी, तर सांताक्रूझ येथे ७७ मिमी पावसाची नोंद झाली. शहराच्या तुलनेत उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता, परंतु हवामान विभागाने कोणताही इशारा दिला नसल्याने आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला होता. त्यानंतर दुपारी ४ नंतर हवामान विभागाने सुधारित अंदाज जाहीर करून मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला. दरम्यान, विदर्भ आणि आसपासच्या परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. ही हवामान प्रणाली वायव्य दिशेने असल्याने कोकण पट्ट्यात, तसेच इतर भागात पावसाचा जोर वाढला आहे. साधारण शनिवारपर्यंत पाऊस पडेल, त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्याची स्थिती
विदर्भ आणि मराठवाड्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात शुक्रवारीही पावसाचा जोर कायम होता. या भागातही शनिवारपर्यंत पावसाचा जोर राहील. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल. संपूर्ण राज्यात रविवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता नाही. कोकण आणि घाटमाथ्यावर सोमवारपासून पुन्हा पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यातील पावसाच्या नोंदी (सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत)
डहाणू – ६६.४ मिमी
ठाणे – ७१.२ मिमी
रत्नागिरी – २८ मिमी
मालेगाव – २४.४ मिमी
हर्णे – १२४ मिमी
माथेरान -४७.२ मिमी
पावसाचा अंदाज कुठे
मुसळधार पाऊस
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर.
मेघगर्जनेसह पाऊस
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी.
हलक्या ते मध्यम सरी
मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव