शहर आणि उपनगरांत हाहाकार * मध्य, हार्बर रेल्वे ठप्प * रस्त्यांचीही वाहतूक आणि पाऊस कोंडी
मुंबई : जोरदार पावसासमोर बुधवारी सरकारी यंत्रणेने सपशेल गुडघे टेकल्याने अनेक भाग जलमय होत असतानाच मध्य, हार्बर आणि पश्चिम उपनगरी रेल्वेसेवाही पुरती ठप्प झाली. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील जनजीवन पुरते कोलमडले.
मुंबई महानगर प्रदेशातील नोकरदार जिच्या जिवावर पोटापाण्यासाठी दाही दिशांना कामानिमित्त जात असतात, त्या उपनगरी सेवेने काही ठिकाणी सकाळीच मान टाकायला सुरूवात केली. मध्य, हार्बरपाठोपाठ सकाळपासून धुगधुगी टिकवलेली पश्चिम रेल्वेही दुपारच्या सुमारास कोलमडली आणि अनेक प्रवाशांच्या नशिबी पायपीट आली.
रेल्वेसेवेचे चाक रूतून गेल्याने रस्तामार्गे घराकडे जाण्यासाठी अनेकांनी धाव घेतली. मात्र अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवरही पाणी साचल्याने त्यांना तासन् तास वाहतूक कोंडीत अडकावे लागले. त्यामुळे अनेकांच्या संतापाचा स्फोट समाज माध्यमांवर सुरू होता.
पवई, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोड, शीव-पनवेल महामार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग, वडाळा पूल, बीकेसी अशा विविध भागांत वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले. ओला-उबरचा प्रतीक्षा अवधी तब्बल तास-दीड तास होता.
सकाळी साडेआठपर्यंत बोरीवली परिसरात १३१ मिमी, ठाणे मानपाडय़ात १७७, कासारवडवलीत १५०, बीकेसीत १४९, भायखळा येथे ११२, कुलाबा येथे १२२ आणि अंधेरीत १२३ मिमी पावसाची नोंद झाली होती. पावसाचा रंग पाहून स्थानिक प्रशासनाने सावधगिरी बाळगत शाळांना सुट्टी जाहीर केली. त्यामुळे मुलांचे हाल वाचले.

कांजूर मार्ग, विक्रोळी, कुर्ला, माटुंगा, दादर, शीव स्थानकांदरम्यान रूळावर पाणी साचू लागल्याने मध्य रेल्वे मंदावली. दुपारी १२च्या सुमारास प्रथम हार्बर आणि पाठोपाठ मध्य रेल्वेने मान टाकली. त्यात विरारला तांत्रिक बिघाडामुळे विरार-चर्चगेट सेवेला फटका बसला. काही स्थानकांत पाणी साचल्याने दुपारी दोनच्या सुमारास पश्चिम रेल्वे सेवाही पार ढेपाळली. गाडय़ा जागच्या हलत नसल्याने आणि रेल्वेकडूनही परिस्थितीची माहिती उद्घोषणांच्या आधारे दिली जात नसल्याने हजारो प्रवाशांनी रूळावर उतरून जवळचे स्थानक गाठले. लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ाही रद्द झाल्याने सामानसुमान घेऊन स्थानकावर अनेक प्रवासी ताटकळत होते.
पश्चिम रेल्वेवरील वाहतूक संध्याकाळी सहानंतर संथ गतीने सुरु झाली असली तरी, मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते घाटकोपर दरम्यानची वाहतूक मात्र सुरूच झाली नव्हती. त्यामुळे कामावरून घरी निघालेल्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागले. घाटकोपर, ठाणे आदी स्थानकावरील वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीचेही प्रसंग घडले. मेट्रोने येणाऱ्या गर्दीमुळे घाटकोपर स्थानकात अभूतपूर्व गर्दी झाली.
पश्चिम रेल्वेवरील वाहतूकदेखील सुरळीत झाली नसल्यामुळे सांताक्रूझ आणि वांद्रे स्थानकांच्या दरम्यान अनेक प्रवासी रुळावरून पायपिट करीत होते.
उपनगरांतही पावसाचा जोर चांगलाच होता. सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान सहा तासांत दक्षिण मुंबई परिसरात १०० मिमी तर पूर्व उपनगरात १३१ मिमी आणि पश्चिम उपनगरांत १४५ मिमी पाऊस झाल्याचे महापालिका कक्षाकडून सांगण्यात आले.
सीएनजी टंचाईची भर
ओएनजीसीच्या उरण प्रकल्पात मंगळवारी आग लागल्याने बुधवारी सीएनजीचा पुरवठा अतिशय कमी होता. त्यामुळे अनेक रिक्षा, टॅक्सी रस्त्यावर येऊच शकल्या नाहीत.
मेट्रो आणि बेस्ट
या पाऊस संकटात मुंबईकरांना आधार मिळाला तो मेट्रो-१, बेस्ट आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर सेवेचा. मेट्रो सुरू राहल्याने घाटकोपर-अंधेरी दरम्यान प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला. रात्री बाराच्या सुमारास सीएसएमटी स्थानकात शंभरहून अधिक प्रवासी टॅक्सीच्या प्रतीक्षेत होते.
‘मोनो’ला तुफान गर्दी
मध्य रेल्वेची सेवा रात्री उशिरापर्यंत सुरु न झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी रस्त्यामार्गाने घरी जाण्याचा पर्याय स्वीकारला. परिणामी, सीएसएमटी आणि दक्षिण मुंबईतील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. सीएसटी येथून पूर्व मुक्त मार्गावर पोहचण्यास वाहनांना एक तासाचा कालावधी लागत होता. तुलनेने पूर्व मुक्त मार्गावरील वाहतूक सुरळीत होती. लोअर परळ परिसरात अनेक कार्यालये असल्यामुळे तेथे अनेकांनी मोनो रेल्वेच्या मार्गावरुन प्रवास करायचा प्रयत्न केला. पण तेथेही प्रचंड गर्दी असल्यामुळे आणि मोनो सेवेची वारंवारीत अध्र्या तासाने असल्याने रांग पुढे सरकत नव्हती. लोअर परळ परिसरात ओला-उबर वाहनेदेखील उपलब्ध नव्हती, नेहमीच्या टॅक्सीही ठाण्याच्या दिशेने यायला तयार नव्हत्या.
दादर, अंधेरीत सर्वाधिक पावसाची नोंद
मंगळवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झाले. बुधवारी सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत शहरातील दादर, पूर्व उपनगरात विक्रोळी, तर पष्टिद्धr(१५५)म उपनगरातील अंधेरी भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. दादरमध्ये १६८.१५ मि.मी., विक्रोळीत १८४.१७ मि.मी., तर अंधेरी पूर्व भागात २१४.३५ मि.मी., तर अंधेरी पश्चिम भागात २००.१७ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर वडाळ्यामध्ये १५८.९७ मि.मी., धारावीत १४८.५८ मि.मी. पावसाची नोंद झाली.
पुणे-मुंबईदरम्यानच्या सर्व रेल्वे गाडय़ा आजही रद्द
मुंबई परिसरामध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, पुणे- मुंबई दरम्यानच्या सर्व एक्स्प्रेस गाडय़ा बुधवारी (४ सप्टेंबर) रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. या गाडय़ा गुरुवारीही (५ सप्टेंबर) धावणार नाहीत, असे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. पुणे- मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, इंद्रायणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेस आदी गाडय़ा बुधवारी धावल्या नाहीत. परिस्थिती अद्यापही आटोक्यात नसल्याने या गाडय़ा गुरुवारीही रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील सहा गाडय़ा रद्द करण्यात आल्या, तर १५ गाडय़ांचा प्रवास पालघर, डहाणू, विरार स्थानकावर थांबवण्यात आला. मध्य रेल्वेवर १७ गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून, १८ गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
विमानसेवा विस्कळीत
मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका विमान सेवेलाही बसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील २० विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. बहुतांश विमानांचे उड्डाण एक तासापेक्षा अधिक उशिराने होत होते. तसेच मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना उशीर होत होता. दरम्यान, विमानतळ अधिकाऱ्यांनी मात्र सर्व सेवा सुरळीत असल्याचा दावा केला. इंडिगो कंपनीच्या एका विमानाला सुमारे आठ तासांचा विलंब झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ट्विटरद्वारे त्यांनी आपल्या संतापाला वाचा फोडली. अनेक प्रवाशांनी विमानातूनच ट्विट करत रोष व्यक्त केला. आणखी एका विमानात सुमारे तासभराहून अधिक काळ प्रवासी विमानतळावर उतरण्यासाठी तिष्ठत राहिल्याचे ट्विट करण्यात आले. इंडिगोचे अनेक कर्मचारी पावसामुळे विमानतळावर पोहोचू शकेल नाहीत, परिणामी इंडिगोची ३० विमाने उड्डाणाच्या प्रतीक्षेत विमानतळावर खोळंबून राहिली, असे इंडिगोने स्पष्ट केले.
दोन कामगारांचा मृत्यू
पी-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीत कांदिवली येथे कर्तव्यावर असलेले सफाई कामगार जगदीश परमार्थ यांचा बुधवारी दुपारी हृदयविकाराने मृत्यू झाला. घनकचरा व्यवस्थापन चौकीतील कामगार विजेंद्र बागडी यांचाही कर्तव्यावर असताना मृत्यू झाला.