मुंबई : रस्त्यांवर साचणारे पावसाचे पाणी उपसण्यासाठी मुंबई महापालिकेने यंदा तब्बल ५०० हून अधिक पंप विविध ठिकाणी बसवले होते. मात्र तरीही मुंबईतील जवळपास सर्वच रस्ते दोन दिवसात जलमय झाले होते. मे महिन्यातील पावसानंतर छोट्या पंपांची संख्या वाढवण्यात आली होती. तरीही मुंबईकरांची मात्र पावसाच्या पाण्यापासून सुटका झाली नाही. तर गरज पडल्यास आणखी पंप वाढवण्याचे निर्देश आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
मे महिन्याच्या अखेरीस पडलेल्या पावसात मुंबईतील अनेक भाग जलमय झाले, पाणी भरण्याची अनेक नवीन ठिकाणे आढळून आली. पावसाचे पाणी भरण्याची ठिकाणे गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढल्यामुळे पाणी उपसा करणाऱ्या पंपांची संख्याही मुंबई महापालिकेने वाढवली. आधी ४२२ पंपांची व्यवस्था करण्यात येणार होती. ती संख्या वाढवून जून महिन्यात मुंबईत ५१४ पंप बसवण्यात आले होते. प्रत्यक्षात गेल्या दोन दिवसात ५४० पंप तैनात ठेवण्यात आले होते. तसेच एखाद्या ठिकाणी पंप बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून वाहनारुढ फिरते १० मोठे पंपही तैनात करण्यात आले होते. इतके पंप असूनही मुंबईतील प्रत्येक गल्ली, रस्ता, स्थानक जलमय झाल्याचे चित्र होते.
मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे दरवर्षी सखलभागात पावसाचे पाणी साचते व त्याचा वेळीच निचरा होत नाही. मुंबईला चारही बाजूने समुद्राने वेढलेले असून मुंबईत पावसाचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका मुंबईला असतो. मात्र पाणी भरण्याची ठिकाणे कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. तसेच सूक्ष्म नियोजनांतर्गत दरवर्षी विविध ठिकाणच्या पर्जन्यजल वाहिन्यांची क्षमता वाढवण्याचेही काम केले जात आहे.
तरीही मुंबईतील पाणी साचण्याची ठिकाणे कमी झालेली नाहीत. यंदा तर पाणी साचण्याची ठिकाणे कमी होण्याऐवजी त्यात भरच पडली आहे. इतकेच नाही तर दक्षिण मुंबईतील कुलाबा, चर्चगेट, मंत्रालय हे परिसर कधीही पाणी न भरण्यासाठी प्रसिद्ध असून ते परिसरही सोमवारच्या पावसाने जलमय झाले. तर गेल्या काही वर्षात उपाययोजना करून जे भाग पूरमुक्त केले त्या भागातही यंदा पाणी साचले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी उपसा करणाऱ्या उदंचन पंपांची संख्या वाढवली आहे.
विविध कारणांमुळे हे उदंचन पंप कार्यान्वित न झाल्यास सखल भागामध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागतो. या समस्येवर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने या वर्षी वाहनांवर आरूढ १० फिरते उदंचन संच तयार ठेवले आहेत. २०२५, २०२६, २०२७ आणि २०२८ या चार वर्षांसाठी भाडेतत्वावर वाहनावर आरूढ फिरते उदंचन संच घेतले आहेत.
५४० उदंचन पंपांद्वारे सहा तासात १८२.५ कोटी लिटर पाण्याचा उपसा
मुंबई महापालिका प्रशासनाने ५४० पंपांच्या कार्यक्षमतेबाबत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी अतमिुसळधार पावसात सहा तासात या ५४० उदंचन पंपांद्वारे १८२.५ कोटी लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला. सर्व उदंचन पंपांचे चालन प्रशिक्षित मनुष्यबळातर्फे तीन पाळ्यांमध्ये (शीफ्ट) करण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने दिले.