scorecardresearch

मुंबईतील रुग्णसंख्या शंभरावर

मंगळवारी राज्यात चार करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर १३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबई: मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव काही अंशी वाढत असून मंगळवारी दैनंदिन रुग्णसंख्येने १०० चा आकडा पार केला आहे. मंगळवारी राज्यात १५३ रुग्ण नव्याने आढळले आहेत.

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या १०० च्या वर होती. त्यानंतर तिसरी लाट वेगाने ओसरत आल्यामुळे रुग्णसंख्येत घट कायम राहिली होती. मार्चमध्ये तर दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्याही खाली गेली होती. परंतु एप्रिलपासून यात पुन्हा काही प्रमाणात वाढ होताना आढळली आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ापासून ही वाढ प्रामुख्याने दिसून येत असून दैनंदिन रुग्णसंख्या ५० च्याही वर गेल्याचे आढळले आहे.

राज्यात चार करोनाबाधितांचा मृत्यू

मंगळवारी राज्यात चार करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर १३५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत असली तरी मृत्यूचे प्रमाण फार कमी आहे. मंगळवारी मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मंगळवारी झालेल्या चार मृत्यूंपैकी तीन मृत्यू ठाणे महानगरपालिकेत तर एक मृत्यू बीडमध्ये झाला आहे.

बाधितांचे प्रमाण दोन टक्क्यांवर

मंगळवारी शहरात १०२ रुग्ण नव्याने आढळले आहेत. सोमवारी शहरात ५ हजार ५३ चाचण्या केल्या गेल्या. मात्र तरीही १०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एका दिवसांतच बाधितांचे प्रमाण सुमारे दोन टक्क्यांवर गेले आहे.

रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण अल्पच

दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल करण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही अल्पच आहे. मंगळवारी आढळलेल्या १०२ रुग्णांपैकी तीन रुग्णांनाच दाखल करावे लागले आहे. सध्या रुग्णालयात १९ रुग्ण उपचार घेत आहेत.

उपचाराधीन रुग्णांची संख्या पुन्हा पाचशेच्या घरात

दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या पुन्हा पाचशेच्या घरात पोहोचली आहे. सध्या शहरात ५४९ उपचाराधीन रुग्ण आहेत. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या ९४३ झाली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai reports over 100 fresh covid 19 infections zws

ताज्या बातम्या