Mumbai revenge crime : मुंबईत एका २७ वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचा अर्धनग्न व्हिडिओ बनवून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी शुक्रवारी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाच्या ठिकाणी बेशिस्त वर्तन केल्यावरून गुन्ह्यातील मुख्य आरोपीविरोधात पीडित व्यक्तीने तक्रार केली होती. त्यानंतर आरोपीला त्याची नोकरी गमवावी लागली होती. याचा बदला घेण्यासाठी आरोपीने हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अग्नल एस गोम्स आणि आदित्य राजश्री बडेकर अशी आरोपींचे नावे आहेत. तर गोम्स आणि तक्रारदार हे पूर्वी एका ठिकाणी काम करत होते.

गोम्स आणि २७ वर्षीय पीडित हे दोघं एका कॉल सेंटरमध्ये एकत्र काम करत होते. व्यवस्थापकीय पदावर कामाला असलेला गोम्स हा लोकांना त्याच्या मर्जीप्रमाणे काम करण्यास भाग पाडत असे, यामुळे पीडित व्यक्तीने गोम्स विरोधात प्रशासनाकडे तक्रार केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर एप्रिलमध्ये गोम्स याला कामावरून काढून टाकण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोम्सला याचा बदला घ्यायचा होता आणि त्याने तक्रारदाराच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याचा मित्र बडेकर हा देखील अनेकदा त्याच्याबरोबर असायचा, असेही पोलिसांनी सांगितले.

मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी सांगितले की, “गुरुवारी पहाटे २७ वर्षीय तरुण कामावरून घरी परतत होता. त्याला कॅबमधून खाली सोडल्यानंतर बडेकर सुरुवातीला त्याच्याजवळ गेला, त्यानंतर दोघांनी तक्रारदाराला बेदम मारहाण केली”. इतकेच नाही तर तो बदला घेत आहे हे तेथील कर्मचाऱ्यांना दाखवण्यासाठी ते दोघे पीडित तरूणाला अंधेरीतील कॉल सेंटरमध्येही घेऊन गेले, अशी माहितीही नगरकर यांनी पुढे बोलताना दिली.

हेही वाचा>> “संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर…”, बजरंग सोनवणे यांचा मोठा इशारा…

नंतर दोन आरोपींनी पीडित तरुणाला एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्याला १२ तासांहून अधिक काळ कोंडून ठेवले. नंतर त्याला अर्धनग्न व्हिडीओ काढायला भाग पाडले, असेही पोलिसांनी सांगितेल. इतकेच नाही तर पीडित तरुणाच्या हातात गांजाचे पॅकेट हातात पकडायला भाग पाडून तो ड्रग्ज विकत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्नही झाला, असेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान पीडिताकडून नेमकी किती रक्कम लुबाडण्यात आली याबद्दल पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.

पोलिसात तक्रार दिली तर तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करू अशी धमकी देऊन आरोपीने त्या व्यक्तीला मालाड येथील त्याच्या राहत्या घराजवळ सोडून दिले. घरी पोहचल्यावर पीडित तरूणाने मालवणी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आणि दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“दोन्ही आरोपींना शुक्रवारी अटक करण्यात आली असून या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेत आहोत,” असेही नगरकर यावेळी म्हणाले.