मुंबई : खड्डेमुक्त मुंबईची महत्त्वाकांक्षी घोषणा करीत मुंबई महानगरपालिकेने २०२३ मध्ये रस्त्यांसाठी महानिविदा काढल्या होत्या. तब्बल १२ हजार कोटींची रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे दोन टप्प्यात हाती घेण्यात आली आहेत. एकूण ६९८ किमी लांबीच्या रस्ते कामांपैकी आतापर्यंत ४९ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे ऑक्टोबर महिन्यापासून हाती घेण्यात येणार असून ही सर्व कामे पूर्ण होण्यास २०२७ उजाडणार आहे. त्यामुळे खड्डेमुक्त मुंबईचा हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून सुमारे दीड वर्ष लागणार आहे.
मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने रस्ते कॉंक्रीटीकरण केले जात आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने कॉंक्रीटीकरणाच्या तब्बल १२ हजार कोटींच्या महानिविदा काढल्या होत्या. दोन टप्प्यात ही कामे सुरू आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामे जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाली, तर दुसऱ्या टप्प्यातील कामे ऑक्टोबर २०२४ मध्ये सुरू झाली.
रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण प्रकल्पाच्या टप्पा १ आणि टप्पा २ अंतर्गत ३१ मे २०२५ अखेर एकूण १३८५ रस्त्यांचे मिळून ३४२.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रीटकरण पूर्ण करण्यात आले आहे. या अंतर्गत, ७७१ रस्त्यांचे एकूण १८६ किलोमीटर लांबीचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेले आहे. तर, ५७४ रस्त्यांवर एकूण १५६.७४ किलोमीटर लांबीचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले आहेत, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
टप्पा १ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ६३.५३ टक्के, तर टप्पा २ अंतर्गत निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ३६.८४ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. म्हणजेच टप्पा १ आणि टप्पा २ असे एकत्रित मिळून पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी ४९.०७ इतकी आहे. पावसाळा संपल्यानंतर म्हणजेच १ ऑक्टोबर २०२५ पासून काँक्रीटीकरणाची कामे पुन्हा वेगाने सुरू केली जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. ही कामे सुरू करताता आधी अर्धवट स्थितीतील रस्ते कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. यावेळी रस्त्यांची कामे हाती घेताना इमारतींचा प्रवेश मार्ग पूर्ण बंद होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
२५ रस्त्यांची कामे रद्द
या महानिविदांपैकी मुंबईतील विविध ठिकाणच्या सुमारे २५ रस्त्यांची कामे रद्द करण्यात आली आहेत. काही ठिकाणी अस्तित्वात असलेला रस्ता सुस्थितीत असल्यामुळे नागरिकांनी रस्ते कामांना विरोध केला होता. तर काही ठिकाणी रस्त्यांवर अतिक्रमण असल्यामुळे रस्ता अरुंद झाल्यामुळे काम रद्द करण्यात आले आहे. संपूर्ण मुंबईतील असे सुमारे २५ रस्ते रद्द करण्यात आले असून त्यांची लांबी सुमारे पाच किमी असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
रस्ते काँक्रीटीकरण (टप्पा १ व २) माहिती
१) रस्ते संख्या – २१२१
२) एकूण लांबी – ६९८.७३ किलोमीटर
काँक्रिट कामे पूर्ण –
१) रस्ते संख्या – ७७१
२) एकूण लांबी – १८६.०० किलोमीटर
काँक्रिट कामे अंशत: पूर्ण –
१) रस्ते संख्या – ५७४
२) एकूण लांबी – १५६.७४ किलोमीटर
अद्याप कामे सुरू झाली नाहीत
१) रस्ते संख्या – ७७६ २)
एकूण लांबी – २०८.७० किलोमीटर