मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदानाच्या वाढीव टप्पा मिळावा या मागणीसाठी ऊन पावसाची तमा न बाळगता आझाद मैदानावर शिक्षक आंदोलन करीत आहेत. आमदार रोहित पवार यांनीही या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला असून मंगळवारी रात्रभर त्यांनी आझाद मैदानावर मुक्काम केला. अद्यापही ते आंदोलनात बसले असून थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार शिक्षकांची भेट घेण्यासाठी मैदानात दाखल होणार आहेत.
राज्य शासनाने ऑक्टोबर २०२४ मधील अधिवेशनात राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भात निर्णय घेतला. मात्र, अद्यापही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शिक्षक संतप्त झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे या देखील सहभागी झाल्या होत्या. त्यांनतर गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. राजकीय पाठिंबा मिळत असल्याने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार हे कालपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांनी मंगळवारी रात्रभर आझाद मैदानावर मुक्काम केला असून अद्यापही ते तिथेच आहेत. शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत, तसेच त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत शिक्षकांसोबत आझाद मैदानावरच थांबण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. शरद पवारही शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी आझाद मैदानात दाखल येणार आहेत. रोहित पवार यांच्यासह आंदोलनात जयंत आसगावकर, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, जमू अभ्यंकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी आझाद मैदानावर उपस्थित आहेत.
आंदोलनाला मिळत असलेला राजकीय पाठिंबा आणि शिक्षकांची आक्रमक भूमिका लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील बुधवारी दुपारी शिक्षकांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लागेल, अशी चर्चा आंदोलनात सुरू आहेत.
पावसामुळे धांदल
कालपासून पावसाची रिपरिप सुरू असून त्यामुळे आंदोलनकर्त्या शिक्षकांची धांदल उडत आहे. मंगळवारी उशिरा रात्रीही पावसाने हजेरी लावल्यामुळे शिक्षकांची पळापळ झाली. अनेकांनी लगतच्या मंडपात आसरा घेतला. मात्र, काही वेळातच पाऊस थांबल्याने आंदोलनकर्त्यांना दिलासा मिळाला.