मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ या मार्गिकेवरील आरे – बीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस सुरू होईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) स्पष्ट केले होते. मात्र, आता हा टप्पा मार्च २०२४ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणार असल्याचे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न लांबणीवर पडले आहे.
एमएमआरसीने ३३.५ किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम २०१६ पासून हाती घेतले. हे काम पाच वर्षांत म्हणजे २०२१ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. मात्र, तांत्रिक बाबी, आरे कारशेड वाद, पुनर्वसन आदी कारणांमुळे एमएमआरसीला हा मुहूर्त साधता आला नाही. परिणामी प्रकल्पाच्या पूर्णत्वाची तारीख डिसेंबर २०२३ जाहीर करण्यात आली होती. त्यादृष्टीने गेल्या दीड-दोन वर्षांत एमएमआरसीने कामाला वेग दिला. त्यानुसार पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर, पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी नऊ मेट्रो गाडय़ा सज्ज झाल्या आहेत.
हेही वाचा >>> Western Railway Mega Block : पश्चिम रेल्वेवर आज रात्री ‘मेगाब्लॉक’
पहिला टप्पा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक चाचण्यांना सुरुवात करून रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) प्रमाणपत्र घेण्यात येणार असल्याची माहिती अश्विनी भिडे यांनी ‘लोकसत्ता शहरभान उपक्रमाअंतर्गत संवाद साधताना दिली.
आरडीएसओ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एमएमआरसीला मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणापत्र घ्यावे लागणार आहे. एकूणच या प्रक्रियेसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पहिला टप्पा मार्च २०२४ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिला टप्पा लांबल्याने साहजिकच दुसरा टप्पाही पुढे गेला आहे. बीकेसी – कफ परेड हा दुसरा टप्पा सप्टेंबर २०२४ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणार असल्याचेही भिडे यांनी सांगितले.
दरम्यान, भुयारी मेट्रो सुरू झाल्यानंतर काही वर्षांत या मेट्रोतून १७ लाख प्रवासी प्रवास करतील. आरे – कफ परेड असा प्रवास या मेट्रोमुळे काही मिनिटात पार करता येणार आहेच.
मेट्रो ३ च्या कामाची सद्य:स्थिती
* आरे – कफ परेड मेट्रो ३ मार्गिकेचे ८६ टक्के काम
* आरे – बीकेसी पहिल्या टप्प्याचे ९३ टक्के काम
* बीकेसी – कफ परेड दुसऱ्या टप्प्याचे ८० टक्के काम पूर्ण
* भुयारीकरण १०० टक्के पूर्ण
* रूळ टाकण्याचे काम १०० टक्के पूर्ण
* विविध यंत्रणांचे ७० टक्के काम पूर्ण