मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ लाच प्रकरणातून आर्यन खान याची सुटका करण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपाबाबत केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरुद्ध सुरू असलेली चौकशी तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल, अशी हमी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने विलंबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर सीबीआयने ही हमी दिली.
क्रुझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी आर्यन याची सुटका करण्यासाठी वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोप आहे. या आरोपाप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी, या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यासाठी झालेल्या विलंबावर न्यायालयाने बोट ठेवले आणि तपास पूर्ण कऱण्यासाठी आणखी किती वर्ष लागतील ? दहा की २० वर्षे ? अशी विचारणाही न्यायालयाने सीबीआयकडे केली. त्यावर, सूचना घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती सीबीआयच्या वतीने वकील कुलदीप पाटील यांनी न्यायालयाकडे केली. ती न्यायालयाने फेटाळली. त्यानंतंर, तीन महिन्यात प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल, अशी हमी सीबीआयच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली.
तत्पूर्वी, हे प्रकरण गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रकरणी महान्यायअभिकर्ता जनरल तुषार मेहता युक्तिवाद करतील, असे सीबीआय प्रत्येकवेळी सांगून वेळकाढूपणा करत आहे. प्रत्यक्षात सुनावणी होत नसल्याचा युक्तिवाद वानखेडे यांच्या वतीने वरिष्ठ वकील आबाद पोंडा यांनी केला व सीबीआयकडून केल्या जाणाऱ्या विलंबाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच या प्रकरणाचा वानखेडे यांच्या कारकिर्दीवर परिणाम होत असून त्यांची बढती रोखण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, न्यायालयाने वानखेडे यांची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली, तर आम्ही केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागू, असेही पोंडा यांनी न्यायालयाल सांगितले. त्यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने वानखेडे यांची याचिका दाखल करून गेतली. तसेच, त्यांना कठोर कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले.