मुंबई : कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली होती. त्यामध्ये राऊत यांनी लिहिलेल्या ठाकरे-२ ची अर्धवट आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनपटावर आधारित पटकथेचा समावेश होता. या पटकथा परत मिळाव्यात या मागणीसाठी राऊत यांनी आता विशेष न्यायालयात अर्ज केला आहे.
ठाकरे-२ नंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा काढण्याची राऊत यांची तयारी सुरु होती. मात्र, कथित पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने राऊत यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यादरम्यान अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. त्यात दोन्ही सिनेमांच्या पटकथांचा समावेश होता. तसेच, दोन्ही सिनेमांसाठी लागणाऱ्या खर्चाचा हिशेब असलेला कागदही होता. परंतु, हा कागद ईडी अधिकाऱ्यांनी वेगळ्याच संशयातून जप्त केल्याचेही राऊत यांनी अर्जात म्हटले आहे.
या कागदावरील आकड्यांवर ईडी अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आणि हे काहीतरी मोठे घबाड आहे असे समजून या कागदासह दोन्ही सिनेमाची पटकथाही जप्त केली, असा दावाही राऊत यांनी अर्जात केला आहे.