मुंबई : शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची ३० सप्टेंबरपर्यंत यू-डायसवर नोंदणी करणे आवश्यक असल्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र यंदा इयत्ता दुसरी ते आठवीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी शिक्षण विभागाकडून यू-डायस प्रणालीवर नवीन नोंदणी करण्यासाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळाबाह्य, मात्र प्रथमच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची यू-डायस प्रणालीवर नाेंद करणे शाळांना शक्य झालेले नाही. परिणामी संचमान्यतेसाठी योग्य पटसंख्या उपलब्ध होणार नसून संचमान्यतेसाठी शाळाबाह्य विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार नसल्याने शाळांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येतो. या विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील शाळेत प्रवेश दिला जातो. यापैकी अनेक विद्यार्थ्यांना काही कारणास्तव शाळा सोडावी लागते. तर काही विद्यार्थी कधीच शाळेत गेलेले नसतात, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार वर्गात प्रवेश दिला जातो. मात्र पहिलीव्यतिरिक्त अन्य वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांची यू-डायस प्रणालीवर नवीन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो. मात्र यंदा इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नोंदणीचा पर्याय प्रणालीवर उपलब्ध करण्यात आलेला नाही. यंदा मुंबई महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये भरती केलेल्या १६० पेक्षा अधिक शाळाबाह्य विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थांची यू-डायसवर नोंदणीच झालेली नाही. अशा विद्यार्थ्यांची यू-डायसवर नोंदणी न झाल्याने संचमान्यतेसाठी योग्य पटसंख्या नोंदवली जाणार नाही. त्यामुळे संचमान्यतेसाठी शाळाबाह्य विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार नसल्याने शाळांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ड्रॉप बॉक्समध्ये ९ लाख २७ हजार विद्यार्थी

शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये यू-डायस प्रणालीतील ड्रॉप बॉक्समध्ये राज्यातील तब्बल ९ लाख २७ हजार ४१४ विद्यार्थी नोंदवले आहेत. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याच्या माहितीची देवाणघेवाण ड्रॉप बॉक्समार्फत केली जाते. २०२४-२५ मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शाळांनी तातडीने ड्रॉप बॉक्समधून घेण्याचे काम शाळांनी तातडीने पूर्ण करावे, अशी सूचना राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेने केली आहे. अशा विद्यार्थ्यांची पुन्हा नोंदणी केली जाणार नाही,अशी सूचनाही करण्यात आली आहे.

यू-डायस नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी

राज्यातील अनेक भागांमध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे शाळांमधील नियमित हजेरी, तसेच अभिलेख व्यवस्थापन विस्कळीत झाले आहे. अनेक शाळा अजूनही बंद आहेत, तर काहींचे अभिलेख पावसामुळे भिजले आहेत. त्यामुळे ३० सप्टेंबर २०२५ रोजीची पटसंख्या वास्तव दर्शवू शकत नाही. या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबरऐवजी ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरावी, अशी मागणी आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे.