मुंबई : प्रसिध्द हॉलीवूड अभिनेता केयानू रिव्हज याच्याशी इन्स्टाग्रामवर झालेली ओळख आणि त्यानंतर झालेले प्रेम यामुळे अंधेरीत एकटी राहणारी वृध्द महिला आनंदी होती. त्यासाठी तिने मोठी रक्कमही खर्च केली होती. परंतु प्रत्यक्षात समोर आले ते धक्कादायक होते. हा अभिनेता एक भामटा होता. त्याने अभिनेत्याच्या नावाखाली बनावट खाते उघडून या महिलेला जाळ्यात ओढले आणि तिची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्सोवा येथील चार बंगला परिसरात ६९ वर्षीय महिला राहते. तिची ४१ वर्षीय विवाहित मुलगी लग्नानंतर लंडनला स्थायिक झाली. वृध्द महिला मुंबईत एकटीच राहते. तिचे कॅनरा बॅंकेत खाते आहे. लंडनमध्ये असलेल्या मुलीकडे या बॅंकेचे तपशील आहेत. ती ई-मेलद्वारे आईच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवते. ३० जून रोजी या महिलेच्या मुलीला एक ई-मेल आला. तिच्या आईच्या खात्यातून डेहराडून येथील एका अनोळखी खात्यावर ६५ हजार रुपये पाठविण्यात आले होते. डेहराडून येथे कुणीच परिचयाचे नाहीत. मग आईने कुणाल पैसे पाठवले असा प्रश्न तिला पडला. तिने तात्काळ आईला फोन करून विचारणा केला. सुरुवातीला आईने टाळाटाळ केली. नंतर मात्र तिने जे सांगितले ते ऐकून मुलीला धक्का बसला.

हॉलीवूड अभिनेत्याच्या प्रेमात

वृध्द महिला समाजमाध्यमावर सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिला इन्स्टाग्रामवर प्रसिध्द हॉलीवूड अभिनेता केयानू रिव्हज (६१) याची रिक्वेस्ट आली. त्यानंतर दोघांचे बोलणे सुरू झाले. तो इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामद्वारे या वृध्द महिलेच्या संपर्कात होता. काही दिवसातच त्याचे व्यक्तिमत्व आणि बोलण्यावर वृध्द महिला भाळली आणि त्याच्या प्रेमात पडली. त्या अभिनेत्यानेही तिला भेटण्यासाठी भारतात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याला भारतीय चलनाची गरज असल्याचे त्याने तिला सांगितले. त्याने आयडीबीआय बॅंकेच्या एका खात्यावर पैसे पाठवायला सांगितले. त्यानुसार वृध्द महिलेने डेहराडून येथील आशा नहार या बॅक खातेदाराच्या नावावर ६५ हजार रूपये पाठवले. हा अभिनेता तोतया असून फसवणुकीचा प्रकार असल्याचे मुलीने आईला सांगितले.

वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वृध्देच्या वतीने मुलीने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६६ (क), ६६ (ड) आणि फसवणुकीचे कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला.

सायबर फसवणुकीत वाढ

गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन असतो आणि बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन होतात. त्याचाच फायदा घेत सायबर भामटे लोकांची विविध प्रकारे फसवणूक करीत असतात. यामध्ये प्रामुख्याने शेअर्स खरेदी-विक्री, गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन टास्क, ऑनलाईन शॉपिंग, कर्ज मिळवून देणे, नोकरी मिळवून देणे असे प्रकार असतात. समाजमाध्यमावर अनेक भामटे वेगवेगळ्या प्रकारे लोकांची फसवणूक करीत असतात. त्यामुळे कुणाशीही आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.